मुंबई: महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८८ वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात २३ नव्या बाधितांची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले होते. मुंबईत ऑक्टोबर महिन्यानंतर प्रथमच ६०० पेक्षा जास्त तर महाराष्ट्रात १ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री टास्क फोर्सची तातडीची बैठक घेतली. टास्क फोर्सच्या बैठकीत नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या वेळी होणारी गर्दी रोखण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात चर्चा झाली. विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यावर देखील चर्चा झाली. राज्य सरकार आज नवी नियमावली जाहीर करणार आहे. दरम्यान, ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठकीत आढावा घेतला. विविध राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला प्रत्यक्ष वा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा अधिक असल्याने रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज करा असा आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत.
राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मुंबईत मंगळवारी ३२७ रुग्ण आढळून आले होते. तर, गुरुवारी ६०२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, महाराष्ट्रात ११७९ रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळं राज्य सरकार सतर्क झालं असून राज्यामध्ये नवी नियमावाली लागू करण्यात येईल.
आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल, याबाबत राज्य सरकार विचार करत आहेत. विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा टास्क फोर्सच्या बैठकीत करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून आज नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. .
गरज पडल्यास नाईट कर्फ्यू लावा; केंद्राचा सल्ला
देशात ओमायक्रॉनचे ३०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही वेळापूर्वीच हायलेव्हल मिटिंग सुरु झाली आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने ओमायक्रॉनवरून राज्य सरकारांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी राज्यांच्या कोणत्या जिल्ह्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत, त्यांचा डबलिंग रेट, क्लस्टरवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उत्सवांवर प्रतिबंध आणण्याचा सल्ला राज्यांना आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. पूर्णपणे लसीकरण झाले असल्यास ओमायक्रॉनपासून हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून संरक्षण करते. यामुळे डोअर टू डोअर लसीकरण करण्यात यावे असा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.
केंद्राचे सल्ले
– नाईट कर्फ्यू लावा, गर्दीच्या कार्यक्रमांना-ठिकाणांवर निर्बंध लादावेत, खासकरून उत्सव लक्षात घेऊन. कोरोनाचे रुग्ण वाढले तर कंटेनमेंट झोन, बफर झोन तयार करा.
– टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्यांवर लक्ष ठेवण्यावर विशेष लक्ष द्यावे. आयसीएमआरने आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईननुसार दारा दारात जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवावी.
– हॉस्पिटलमध्ये बेड, अँम्युलन्स आणि आरोग्य उपकरणे वाढविण्यावर भर द्यावा. ऑक्सिजनचा बफर स्टक बनवा. तसेच 30 दिवसांच्या औधांचा साठा करावा.
– लोकांना सतत माहिती दिली जावी. अफवा पसरू नयेत याची काळजी घ्यावी, यासाठी राज्यांनी दररोज माहिती द्यावी.
– राज्यांनी १०० टक्के लसीकरणावर लक्ष केंद्रीत करावे. सर्व पात्र लोकांना दोन डोस मिळालेत का हे तपासण्यासाठी दारोदारी जाऊन अभियान राबवावे.
निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत लसीकरणाचा वेग वाढवा
पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यास केंद्र सरकारने त्या राज्यांना सांगितले आहे. ओमायक्रॉनमुळे संसर्ग झपाट्याने वाढत असून त्यामुळे राज्यांनी अतिशय दक्ष राहावे, असेही केंद्राने म्हटले आहे. येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत कमी लसीकरण झालेल्या ठिकाणी संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा भागांत लसीकरणाचा वेग वाढवा अशी केंद्राने त्या राज्यांना सूचना केली आहे. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना स्थितीवर बारीक लक्ष ठेवावे, जिथे जास्त संख्येने नवे रुग्ण आढळत असतील तिथे कडक निर्बंध लागू करावेत असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. नाताळ व नववर्षाच्या कार्यक्रमात मोठी गर्दी होऊन संसर्ग अधिक पसरू शकतो. हे लक्षात घेऊन अशा कार्यक्रमांवर दिल्ली सरकारने यंदा बंदी घातली आहे. कोणतेही निर्बंध किमान १४ दिवस लागू करा असेही केंद्राने राज्यांना कळविले आहे.
मध्य प्रदेशमध्ये रात्रीची संचारबंदी लागू
संसर्ग रोखण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असा निर्णय इतर राज्यांतही घेतला जाण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी नव्या रुग्णांचे प्रमाण अधिक आढळेल तिथे कडक निर्बंध लागू करा अशा सूचना केंद्र सरकारने याआधीच राज्यांना दिलेल्या आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य खातेही कोरोना स्थितीचा वारंवार आढावा घेत आहे.