ठाणे : कुत्र्यांची, अन्य पशू-पक्ष्यांची जनगणना होते. मात्र, ओबीसी समाजाची स्वतंत्र गणना होत नाही. आरक्षण हा दारिद्र्य निर्मुलनाचा कार्यक्रम नाही. शोषितांना आरक्षण मिळाले, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर महाराष्ट्रात का नाही, अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीने राज्यस्तरीय ओबीसी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती भाषण केलं. यावेळी मंचावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे, राष्ट्रवादीचे ठाणे शहाराध्यक्ष आनंद परांजपे, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर, शहराध्यक्ष गजानन चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांनी स्टेजवर खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन चक्क ढोल वाजवित मंचावर प्रवेश केला. जातीचा अभिमान केव्हा येतो, जेव्हा तुम्हाला जात समजते तेव्हा. दुर्देवाने ओबीसींना सर्व हातात मिळालं. त्यामुळे त्यांना जातच समजली नाही. ज्यांना समजली ते पुढे गेले. पण ३५४ जाती आहेत. त्यापैकी आरक्षणाचा लाभ घेतलेल्या फक्त १६ ते १७ जाती आहेत. बाकी आजही सर्व जाती दऱ्याखोऱ्यात पाल्यावस्त्यात राहतात. त्यांना बाहेर काढून त्यांची शैक्षणिक प्रगतीची करण्याची गरज आहे. ती गरज भागविण्यासाठीच मी तुम्हाला एकत्रं केलं आहे. त्यात माझा कोणताही राजकीय हेतू नाही, असं आव्हाड यांनी सांगितलं.
कार्ल मार्क्सपेक्षा एक इंचही महात्मा फुले कमी नव्हते. आपल्याकडे ३५४ जाती आहेत. अनेक जातीचे लोक इथे आले. मी स्वतःच ओबीसी आहे, मी राजकारण केले नाही. पण, ओबीसी जनगणना आणि आरक्षण यासाठी मला लढावे लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वांत जास्त डोक्यावर छप्पर नाही, ते आदिवासी आणि भटके आहेत. काहींना आपण मागासवर्गीय आहे, हे सांगायची लाज वाटते. आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीबाबत ओळख नाही हे दुर्दैव आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
शिक्षण, नोकऱ्या आरक्षणाचा मुद्दा आहे. पण, आता नोकऱ्याच कुठे राहिल्या आहेत, ज्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. मात्र, आरक्षण काढल्याने ११ लाख लोकांची पदे गेली, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भगवाबाबत अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सलाम करतो. मी त्यांना मानतो ज्यांनी जिजाऊ ला सती जाऊ दिले गेले नाही. शिवाजी महाराजांकडे जास्तीत जास्त ओबीसी समाज होता. आपल्या पिढ्या काही शिकल्या तर आपण पुढे जातो आणि जात विसरतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
आरक्षणाची लढाई निकराने लढावी लागेल
मंडल आयोगामुळे तुमच्यातील महापौर निर्माण झाला. सोलापुरात कलाल समाजाची पहिली महापौर झाली ते मंडल आयोगामुळेच! कलाल समाजाबद्दल किती लोकांना माहित आहे, कलाल हा हा दारु विकणारा समाज आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पिछडा अन् अतिपिछडा वर्ग आहे. त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव आहे. मात्र, महाराष्ट्रात जातीबाबत ओळख नाही. हे दुर्देव आहे. तुम्हाला गप्प बसून आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी जोरात ओरडावे लागेल. आपले अधिकार लढून मिळतात, शांत बसून नाही. आपल्यालाही लढाई निकराने लढावी लागेल. त्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडावे लागेल, असे सांगतानाच आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. शोषित आणि वंचितांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिले गेले आहे. शोषित लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी सांगितले आहे, असं ते म्हणाले.
५० टक्क्यांची मर्यादा कशासाठी?
५० टक्क्यांची मर्यादा ही कोणाच्या सुपीक डोक्यातून आलेली आहे. हे मला तरी आजपर्यंत समजलेले नाही. जनगणनेशिवाय आकडेवारी कळत नसल्याने तुम्ही टक्केवारी तरी कशी ठरवणार? त्यामुळे येथील सामाजिक व्यवस्थेत मागे असलेल्या जातींना मागेच ठेवण्याचे काम या ५० टक्क्याच्या मर्यादेमुळे झालेले आहे. त्यासाठी जातगणना करा. म्हणजे, जेवढी ज्यांची लोकसंख्या तेवढा त्यांना हिस्सा मिळेल. आज ५० टक्क्यांची मर्यादा आपण काढून टाकली तर मागासलेल्या मराठा बांधवांना देखील आरक्षण देता येतील आणि ते न्याय्य ठरेल. त्यांनी आपापसात भांडावे आणि लढत रहावे, याच साठीच ५० टक्क्यांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे मी इथे आहे. माझे वडील कधी गावी गेले नाहीत. माझी आई लॅमिंग्टन रोडला भाजी विकायची. दोघांनी प्रचंड कष्ट केले. आमच्याकडे शेतीही नव्हती. सुमारे २२ वर्ष माझे वडील सीएसटी स्टेशनला झोपत होते. आई-वडिलांनी खूप कष्ट सोसून मला मोठे केले. गरिबी काय असते ते मी पाहिले आहे. आता गरिबांसाठी काही कामे हातात घेतली आहेत, असे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.