नवी दिल्ली : प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँने उद्योगपती निखिल जैनसोबत लग्नच मान्य नसल्याचे सांगून वाद ओढवून घेतला आहे. प्रेग्नंट असलेल्या नुसरतसमोर आता नवीन अडचणी उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नुसरत जहाँची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अमित मालवीय हे भाजपाचे आय़टी सेल प्रमुख आहेत. त्यांनी नुसरत जहाँच्या निखिल जैनसोबत लग्न मान्य नसल्याच्या वक्तव्यावर ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तृणमूल खासदार नुसरत जहाँ रुही जैन यांचे हे खासगी आयुष्य आहे. त्या कोणासोबत लग्न करतात, कोणासोबत राहतात याच्याशी कोणाचा काही संबंध असता नये. परंतू त्या एक लोकप्रतिनिधी आहेत. मग अशावेळी भर संसदेत नुसरत जहाँ यांनी निखिल जैनसोबत लग्न केल्याची घोषणा केली होती. हे संसदेच्या रेकॉर्डवर आले आहे. आता त्या लग्न नाकारत आहेत. मग त्या संसदेत खोटे बोलल्या का? असा सवाल उपस्थित केला आहे.
नुसरत जहाँ यांनी संसदेत शपथ घेण्याआधी हे लग्न केले होते. यानंतर त्या सपथ घेत असताना सलाम वालेकुम नमस्कार असे म्हणत मी, नुसरता जहाँ रुही जैन….अशी शपथ घेतली होती.
TMC MP Nusrat Jahan Ruhi Jain’s personal life, who she is married to or who she is living in with, should not be anyone’s concern. But she is an elected representative and is on record in the Parliament that she is married to Nikhil Jain. Did she lie on the floor of the House? pic.twitter.com/RtJc6250rp
— Amit Malviya (@amitmalviya) June 10, 2021
बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ आणि तिचे पती निखिल जैन यांच्या वैवाहिक नात्यात कटुता आली आहे. नुसरत जहाँ हिने २०१९ मध्ये उद्योगपती निखिल जैन याच्याशी विवाह केला होता. नुसरत जहाँ हिने स्वत:च आपल्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र आता नुसरत जहाँ ही हा विवाह वैध नसल्याचे सांगत आहे. गेल्या काही काळापासून नुसरत आणि निखिल यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या. गेल्या सहा महिन्यापासून आपण एकत्र राहत नसल्याचे नुसरतचा पती निखिल याने सांगितले आहे. याचदरम्यान नुसरत गर्भवती असल्याची चर्चाही सुरू झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना निखिलने याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे तसेच ती गर्भवती असेल तर ते मुल त्याचे नसल्याचे सांगितले.
नुसरत जहाँ हिने या प्रकरणी पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ती म्हणाली की, परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. त्याशिवाय हा एक दोन भिन्न धर्मीय व्यक्तींमधील विवाह असल्याने त्याला भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही. कायदेशीररीत्या हा विवाह वैध नाही आहे. तर हे केवळ एक नाते किंवा लिव्ह इन रिलेशनशिप आहे. त्यामुळे त्यातून बाजूला होण्यासाठी घटस्फोट घेण्याची गरजच नाही, असे तिचे म्हणणे आहे.