आता संजीव जयस्वाल यांचा लेटरबॉम्ब; ठाण्यातील काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर गंभीर आरोप
मुंबई : ठाण्याचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेटरबॉम्ब टाकला आहे. जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ठाण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर याच्यावर गंभीर आरोप करत तक्रार केली आहे. ठाण्याचे आयुक्त असताना खोटं जात प्रमाणपत्र दाखवत नगरसेवक झालेल्या घाडीगावकारांचं पद रद्द केल्यामुळे त्यांनी सूडाच्या भावनेने आपल्या विरोधात खोट्या तक्रारींचा सपाटा लावल्याचा आरोप संजीव जयस्वाल यांनी केला आहे. तसंच त्यांनी त्यांच्या पत्रात चार नेत्यांची नावं घेऊन गंभीर आरोप केले आहेत. जयस्वाल हे पाच वर्षे ठाण्याचे आयुक्त म्हणून काम केलं आहे. त्यांची नुकतीच मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पदावरून मत्स्य विभागात संचालक म्हणून बदली झाली आहे.
संजीव जयस्वाल यांनी संजय घाडीगावकर यांनी जे आरोप केलेत त्याचं उत्तर देण्याबरोबर ठाण्यात जो गैरप्रकार चालतो, खंडणी घेण्याचे जे प्रकार चालतात तसंच जी गोल्डन गॅंग आहे याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामध्ये त्यांनी काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजीव जयस्वाल यांनी त्यांच्या पत्रात गोल्डन गँगमध्ये कोण कोण आहे त्या नेत्यांची नवे घेतली आहेत. यामध्ये सूरज परमार प्रकरणात ज्या चार नेत्यांना अटक करण्यात आली होती ते या गोल्डन गँगमध्ये आहेत. संजीव जयस्वाल यांनी त्या चार नेत्यांची नवे देखील पात्रात घेतली आहेत. काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हनमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे गोल्डन गॅंग चालवत असल्याचं संजीव जयस्वाल यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. तसंच संजय घाडीगावकर देखील यामध्ये सामील आहेत असं जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी संजीव जयस्वाल यांच्यावर आरोप केले होते. यामध्ये त्यांनी संजीव जयस्वाल ५ वर्षे ३ महिने ठाण्याचे आयुक्त आतांना त्यांच्याविरोधात महिलेने तक्रार केली आहे तसंच संजीव जयस्वाल यांनी गैरव्यवहार करून संपत्ती गोळा केली आहे. याची चौकशी व्हावी असा आरोप करत चौकशीची मागणी केली होती. या आरोपांना उत्तर देताना संजीव जयस्वाल यांनी गंभीर आरोप केले आहेत.