मुंबई भाजप नेत्यांना नैराश्य आले असून आता राजकीय आरोप वाढत राहतील आणि रेटून खोटं बोलणं चालू राहिल’, असे राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
सध्या राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.त्यातल्या त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडून शिवसेनेवर आरोपांचा व टीकेचा भडिमार सुरू आहे. वांद्रे येथे उभारण्यात आलेल्या डब्बेवाला भावनाच्या उदघाटनाप्रसंगी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे.
शिवसेनेने मागील २५ वर्षात अनेक वचने दिली आणि ती पूर्ण केली आहेत. त्यामुळेच आम्ही २५ वर्षे सत्तेत राहिलो आहोत. रस्ते, फुटपाथ, पर्जन्य जलवाहिन्या, नाले, मिठी नदी आदी विकासकामे केली असून यापुढेही करत आहोत. मुंबईला पुढे कसे न्यायचे त्याचा विचार करताना डबेवाला भवन उभारणे एक महत्वाचे काम होत ते वचन आज पूर्ण केले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबईत २ ए आणि ७ या दोन मेट्रो मार्गांचे टेस्टिंग सुरू आहे. मेट्रो ३ कारशेडबाबत येत्या आठवड्यात वेगळा निर्णय पहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच, बेस्ट परिवहन विभागात इलेक्ट्रिक बसगाड्यांचा ताफा वाढवत आहोत. आता रात्रीच्याही बसगाड्या धावणारा आहेत. तसेच, महिलांसाठी १०० गाड्या सुरू केल्या असून त्यातही वाढ करणार आहोत. ३५० बस स्टॉप चांगले करत आहोत. ९०० डबल डेकर गाड्या येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. दै.सामनामधील भाजपच्या जाहीरातीबाबत बोलताना ते म्हणाले की, जाहिराती या कुणाच्या येवू शकतात. आपल्याकडेही येवू शकतात.