आता मोकळा श्वास घेतोय, २०२४ ला भाजपची स्वबळावर सत्ता : फडणवीस
मुंबई : पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्या आशा बुचके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बोलताना, मला परकियांनी पराजित केलं नाही. मला स्वकीयांनीच पराजित केलं, छत्रपतींना जसा स्वकीयांकडून त्रास झाला तसाच मलाही झाला, असा आरोप त्यांनी केला. आशा बुचकेंच्या पक्षप्रवेशानंतर बोलताना फडणवीस यांनी युतीमध्ये आम्हाला त्रास झाल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे आता मोकळा श्वास घेत असून २०२४ मध्ये भाजपाची स्वबळावर सत्ता आणू, असेही त्यांनी म्हटले.
पुण्यातील जिल्हा परिषद सदस्या व शिवसेना नेत्या आशा बुचकेंनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यावेळी, शिवसेनेत स्वकीयांकडून माझ्यावर अन्याय झाल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर बोलताना फडणवीस यांनीही युती काळातील त्रासाची, कोंडी झाल्याची आठवणी करुन दिली. तसेच, आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपाला सत्तेवर आणू. आशाताईंसारख्या कार्यकर्त्या सत्तारूढ पक्षातून भाजपामध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.
राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्याने भाजपला ही संधी आहे. जसा तुमचा श्वास कोंडत होता तसा आमचाही काही ठिकाणी श्वास कोंडत होता. आता तीन पक्ष एकत्र आलेत आता श्वास त्यांचा कोंडतोय. युती असल्याने तेव्हा पक्ष वाढीसाठी काही मर्यादा होत्या. पण, आता मोकळा श्वास घेतोय. २०२४ साली भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
जुन्नर विधानसभा निवडणुकीत आशा बुचके यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. याठिकाणचे तत्कालीन मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर जुन्नर मतदारसंघातून शिवसेनेने सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आशा बुचके शिवसेनेवर नाराज झाल्या. नारायणगावच्या पदाधिकारी मेळाव्यात आशा बुचके यांनी सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव आणि विधानसभेत घेतलेली भूमिका यामुळे आशा बुचके यांनी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.