Top Newsराजकारण

राज्यातील २ हजार २९६ एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या २ हजार २९६ कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. या कामगारांनी २४ तासांत कामावर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं या नोटीशीत म्हटलं आहे.

एसटी महामंडळाने आतापर्यंत २ हजार १७८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. काल संध्याकाळी सहापर्यंत ६६ बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आल्या असून जवळपास दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला. सध्या एसटीची हजेरी पटावरील एकूण कामगारांची संख्या ९२ हजार २६६ आहे. तर सध्या हजर कर्मचाऱ्यांची संख्या ७ हजार ४०० आहे. यामध्ये प्रशासकीय ५२२४ कर्मचारी, १७७३ कार्यशाळा कर्मचारी, २६४ चालक आणि १३९ वाहक आहेत. प्रत्यक्षात संपामध्ये भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८४,८६६ आहे.

पडळकरांची राज्यपालांकडे तक्रार

सटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी १० कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्याचं प्रसार माध्यमांसमोर सांगितलं आहे. अक्कलकोटमधून एसटी स्टँडवर जी खासगी बस भरली. ती गाडी सोलापूरकडे जाताना पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असं असताना या संपातून मार्ग काढण्यासाठी या संपामध्ये फूट कशी पडेल. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण कसं निर्माण होईल. कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीसा देणं आणि सेवा समाप्तीच्या धमक्या देणं, असले प्रकार राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे आम्ही राज्याचे पालक म्हणून राज्यपालांना भेटलो. असं भाजपा नेते गोपिचंद पडळकर म्हणाले.

या शिष्टमंडळामध्ये सदाभाऊ खोत, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते, अ‍ॅड. जयश्री पाटील आणि महिला कर्मचाऱ्यांसह आम्ही राज्यपालांची भेट घेतली आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विनंती केली आहे की, परिवहन मंत्री आणि परिवहन सचिव यांच्याकडून माहिती द्या. कशाप्रकारची आणि काय कामं चालू आहेत. यांची माहिती घ्या. इतके दिवस काम चालू असताना. हे सरकार काय काम करत आहे. अशा प्रकारची मागणी केल्याचं गोपिचंद पडळकर म्हणाले आहेत.

लढा आणखी तीव्र करावा लागेल : रामदास आठवले

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवला. रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी आझाद मैदानात आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हा लढा आणखी तीव्र करावा लागेल असं रामदास आठवले यांनी म्हटले.

रामदास आठवले यांच्यासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हेदेखील उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत राज्य सरकारवर टीका केली. एसटीचे विलीनीकरण आणि इतर मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी ठाकरे सरकारला जाग आणावी लागणार आहे. त्यासाठी लढा आणखी तीव्र करावा लागेल असे आठवले यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एसटी नसती तर मी पुढारी नसतो असेही आठवले यांनी म्हटले. आठवले यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button