नवी दिल्ली : मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता १३ वर्षे होत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका काँग्रेस नेत्याने पक्षाला घरचा आहेर देत तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण होते, अशी टीका करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी आपल्या एका पुस्तकात पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई न केल्याबाबत हल्लाबोल केला आहे. मनिष तिवारी आपल्या पुस्तकात म्हणतात की, एखाद्या देशाला (पाकिस्तान) निर्दोष नागरिकांची क्रूरपणे हत्या करण्याची खंत वाटत नाही, तर संयम ही ताकदीचे नाही, तर कमकुवतपणाचे लक्षण आहे, असे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे.
मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर एक मोठी संधी होती, जिथे शब्दांपेक्षा कठोर कारवाई करून जशास तसे उत्तर द्यायला हवे होते, असे सांगत मनिष तिवारी यांनी मुंबई हल्ल्याची तुलना ९/११ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याशी केली आहे. अमेरिकेने जशी तीव्र आणि आक्रमक कारवाई केली, तशी भारतानेही करायला हवी होती, या शब्दांत मनिष तिवारी यांनी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. यापूर्वीही मनिष तिवारी यांनी पंजाबमधील राजकीय अस्थिरतेवरून काँग्रेस पक्षाला घरचा आहेर ते टीका केली होती. तसेच कन्हैय्या कुमारला काँग्रेस पक्षाने दिलेल्या प्रवेशावरूनही मनिष तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, मनिष तिवारी यांच्यानंतर भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही यूपीए सरकारवर टीका केली आहे. मनिष तिवारी यांनी २६/११ च्या संदर्भात स्पष्ट केलेली भूमिका योग्य आहे. यूपीए सरकारचा तो कमकुवतपणाच होता. तेव्हाचे एअर चीफ मार्शल फली मेजन यांनीही वायुसेना कारवाई करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, यूपीएच्या मनमोहन सिंग सरकारने तसे करू दिले नाही. २६/११ च्या कारवाईनंतर यूपीए सरकार हिंदूंना दोषी ठरवण्यात आणि पाकिस्तानचा बचाव करण्यात व्यस्त होते, अशी घणाघाती टीका पूनावाला यांनी केली आहे.