मुंबई: गेल्या सव्वा दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही मंत्रालयात आले नाहीत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र फक्त मुंबईत आहे. मग कशाच्या निकषावर ते पाच टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आले?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
‘इंडिया टुडे’ आणि ‘सी व्होटर’ने ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर एक सर्व्हे केला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील टॉपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान मिळालं आहे. या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहे. हा सर्व्हे जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. कोणत्या निकषावर ते पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? कारण गेली सव्वा दोन वर्ष ते एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते लोकांसठी गेल्या ८०-९० दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा सवाल करतानाच त्यांना क्रमांक मिळावा असेच निकष असतील असा चिमटाही पाटील यांनी काढला.
कोल्हे गोडसेशी सहमत आहेत का?
यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने त्यावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नथुराम गोडसे यांची भूमिका अमोल कोल्हे यांनी एक अभिनेता म्हणून करणे यात मला काही गैर आहे असं वाटत नाही. नथुराम गोडसेंच्या विचारांशी ते सहमत आहेत का ते त्यांनी जाहीर करावं. एक अभिनेता कुणाचीही भूमिका करू शकतो. उद्या अफझल खानाचीही भूमिका करू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.
अजित पवारांवर निशाणा
पुणे महापालिकेची निवडणूक जवळ येईल तसतसा चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वाद वाढताना दिसून येतोय, या वादाला यावेळी कारण ठरलंय पुण्यातल्या शाळा आणि कोरोना आढावा बैठक. अजित पवार बैठकीत विश्वासात घेत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तर याला राष्ट्रवादीने त्याला प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार हे विश्वासात घेत नसून बैठकीत आम्ही केलेल्या सूचनांना कचऱ्याची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे आपण बैठकीत सहभागी होत नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू आहे. अशातच पुण्यातल्या कोरोना रुग्णांची सख्या तर धडकी भरवणारी आहे. काल एकट्या पुणे जिल्ह्यातली कोरोना रुग्णांची सख्या पंधरा हजारांच्या जवळ गेली आहे. त्यामुळे पुण्यातल्या शाळांबाबत निर्णय हा अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर घेण्यात येणार असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय. या बैठकीला पुण्याच्या महापौरासह स्थानिक सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र चंद्रकांत पाटलांनी आता हा पवित्रा घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात अजित पवारांना पत्र पाठवणार असेही पाटील म्हणालेत. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय आरोपांना राष्ट्रवादिनेही प्रत्युत्तर दिलंय. कोरोना निर्बंधावरून चंद्रकांत पाटील आणि अजितदादा यांच्यातील राजकीय वाद हे पुणेकरांना काही नवे नाहीत. मात्र हा वाद पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी टोकाला जाणार असंच दिसतंय.