राजकारण

पवारांच्या घरी आज होणाऱ्या बैठकीचा राजकारण, निवडणुकीशी संबंध नाही !

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. मात्र, ही बैठक राष्ट्रमंचची आहे. तिसऱ्या आघाडीची नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक असली तरीही या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आज होत असलेल्या राष्ट्रमंचच्या बैठकीचा २०२४ च्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याशी या बैठकीचा काहीही संबंध नसल्याचं या बैठकीशी संबंधित नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक होत आहे. राष्ट्रमंचचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दुपारी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रमंचचे नेते यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्यासह १५ पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या संसदीय बोर्डाची बैठक होत आहे. या बैठकीला केरळमधील राष्ट्रवादीचे नेते पी. सी. चाको, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.

राजकारण्यांसह विविध क्षेत्रातील नामवंतांना या बैठकीत पाचारण करण्यात आलं आहे. या बैठकीला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ केटीएस तुलसी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी, केसी सिंह, गीतकार जावेद अख्तर, प्रीतीश नंदी, ज्येष्ठ वकील कोलिन गोन्साल्वीज, करण थापर आणि आशुतोष या बैठकीत सामिल होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

यशवंत सिन्हा यांचं ट्विट

माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूलचे नेते यशवंत सिन्हा यांनी काल संध्याकाळी ट्विट केलं होतं. आमच्या राष्ट्रमंचची शरद पवारांसोबत बैठक होणार आहे. दुपारी ४ वाजता ही बैठक होईल. पवारांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच निवासस्थानी ही बैठक होणार असून पवारांनीही त्याला सहमती दर्शवली आहे, असं सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button