ठाण्यात उद्यापासून अनिश्चित काळासाठी लसीकरण बंद

ठाणे: ठाण्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारपासून पुढील आदेश येईपर्यंत ठाण्यातील लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये, असं आवाहन ठाणे महानगरपालिकेने केलं आहे.
मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात दिनांक ९ ते १२ जून या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व केंद्रावरील लसीकरण उद्या १० जूनपासून बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. लसीकरणाबाबत पुढील निर्देश येईपर्यंत सर्व केंद्रावरील लसीकरण बंद राहणार असून नागरिकांनी यांची नोंद घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महापालिकेने आज ४,०२,४०८ उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण पार केला आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी तशी माहिती दिली. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्याटप्प्याने देण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.