लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारला अखेर लोकभावनेसमोर झुकावेच लागले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने पुन्हा लॉकडाऊन लादण्याची तयारी केली होती.परंतु सरकारच्या या हालचाली विरोधात जनमत उभे ठाकले व सरकारला बॅकफूटवर जावे लागले.
सरकारनेही जनमताचा आदर करत लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत करण्यात येत आहे. लॉकडाऊन हे आजच्या घडीला कोणालाच परवडणारे नव्हते. गेल्या वर्षभरात जनतेने जे काही हाल भोगले, त्याचे वर्णन शब्दात करणे, कठीणच आहे. लॉकडाऊनऐवजी आता कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आ. प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी विविध प्रकारचे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मध्यंतरीच्या काळात प्रादुर्भावाचा वेग काही अंशी कमी झाला व आपण सारे बेफाम झालो.मास्क लावणे व हात सॅनिटायझर करणे, या दोन महत्वाच्या बाबीकडे आपण साऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. या दोन्ही वस्तूच्या विक्रीवरही चांगलाच परिणाम झाला. विक्रीत थेट ९४ टक्क्यांनी घट झाली. यावरून आपण किती निष्काळजीपणे वागत होतो, हे दिसून आले.
नव्याने आलेली ही लाट दुसरी असून ती पहिल्या लाटेपेक्षा भयावह असेल, अशी भिती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत आपण बेजबाबदारपणे वागून चालणार नाही. लॉकडाऊनची दाहकता कशी असते, हे आपण गेले वर्षभर चांगलेच अनुभवले. त्यामुळे ते सरकारने लादू नये, यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने विरोध केला. तीच एकजूट नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी दाखवली पाहिजे. सरकारने आपले ऐकले, आता आपण सरकारचे ऐकले पाहिजे. अन्यथा होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही. गेल्या वर्षी जे काही घडले, त्याचा अनुभव गाठीशी असताना यावेळी तरी आपल्याकडून आततायीपणा होणार नाही,याची खबरदारी घ्यायला हवी. कारण आज आपल्यासमोर जीव वाचवण्याचे मोठे आव्हान, या जीवघेण्या विषाणूने उभे केले आहे. कोरोनाच्या आक्रमणापूर्वी मानव, हा जगज्जेता म्हणून ओळखला जात असे, पण या विषाणूने ही ओळख आता पुसली आहे.