मुंबई : ओबीसींचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका नको, अशी भूमिका विरोध पक्ष असलेल्या भाजपने लावून धरली आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनंही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग निघत नाही तोवर कोणत्याही निवडणुका नको अशी भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्र्यांकडून त्यांच्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मंत्र्यांच्या विभागाचा आढावा घेण्यात आला. पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. ईडी कारवाईबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. ईडी कारवाई ही ठरवून होत आहे. भाजप कटकारस्थान करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या जिल्ह्याची स्थिती पाहून कशा लढायच्या हे ठरवलं जाईल. लोकांना उत्तेजित करण्याची भूमिका घेणं योग्य नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका नको ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक यांनी सांगितलं. तसंच येत्या १५ दिवसांत महामंडळाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी दिलीय.
केंद्र सरकारनं नियम घालून दिले आहेत. मात्र, भाजप आंदोलन करुन दहीहंडी साजरी करत दुटप्पी भूमिका घेत आहे. सरकारनं सणांबाबत तयार केलेल्या नियमावलीचं जनतेनं स्वागत केलं आहे. मात्र, राजकीय नेते नियमांचं पालन करत नाहीत. नेत्यांनी राजकीय लाभ घेण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळू नये, असा टोलाही त्यांनी मनसे आणि भाजपला लगावलाय.