नाशिक : सर्वोच्च न्यायालाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर अनेक संघटनांनी, राजकीय पक्षांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या. यादरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती त्यांची भूमिका लवकरच मांडणार असं मंगळवारी सांगितलं. आज ते नाशिक दौऱ्यावर आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना कोरोनाकाळात आंदोलन करु नका, असं मराठा समाजाला आवाहन केलं आहे.
संभाजीराजे आज भूमिका मांडणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु त्यांनी आज कोणतीही भूमिका मांडणार नसून लवकरच ती भूमिका जाहीर करेन असं सांगितलं. माझा अभ्यास झालेला आहे. थोडे दिवस वाट बघून मी भाष्य करणार आहे. अनेक पक्षांच्या भूमिका पुढे येत आहेत. माझी भूमिका नाही. माझी भूमिका ही समाजाची भूमिका असणार आहे. लवकरच ती भूमिका जाहीर करेन, असं संभाजीराजे म्हणाले.
१०२ व्या घटना दुरुस्तीनुसार राज्याचे अधिकार काढून घेतलेत का? अॅटॉर्नी जनरलने काय भूमिका मांडली? पुनर्विचार याचिका या सगळ्यांवर मी बोलणार आहे, असं संभाजीराजे म्हणाले. पण सध्याच्या घडीला कोरोनाची महामारी थांबवणं गरजेचं आहे. आपण जगलो तर आरक्षणाचा लढा देऊ शकतो. म्हणून कोणतीही गोष्ट अशी करुन नये की ज्याचा उद्रेक होईल. या उद्रेकामुळे त्रास सामान्यांना होईल. ही वेळ मोर्चे काढण्याची नाही… ही वेळ नाही उद्रेक होण्याची…ही वेळ माणसं जगवण्याची आहे. माणसं जगली तर पुढे आपण काही तरी करु शकतो, आपण वाईट परिस्थितीतून जात आहोत, असं संभाजीराजे म्हणाले.
नेत्यांना भेटायची काही गरज नाही आहे. पण यावर ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. लवकरच माजी न्यायमूर्ती गायकवाड यांना देखील भेटणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. आशावादी आहे, मार्ग निघणारच, मार्ग निघेपर्यंत गप्प बसणार नाही, असं देखील खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं.