मुंबई: ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट मालिका निर्माते, छात्र भारतीचे संस्थापक कार्यकर्ते, नामांतर चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते नितीन वैद्य यांची रविवारी मुंबईतील अंजुमन ईस्लाम सभागृहात झालेल्या सेवा दल मंडळाच्या राष्ट्रीय बैठकीत राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली.
देशातील २३ राज्यातील सेवा दल मंडळ सदस्य आणि फुल टायमर यांनी या निवडणुकीत मतदान केले. त्यापैकी २२८ मते नितीन वैद्य यांना मिळाली. तर विरोधी उमेदवार अलका एकबोटे यांना २ मते, अनुपकुमार पांडे यांना १ मत पडले. निवडणूक अधिकारी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, निवृत्त आयएएस अधिकारी भारत सासणे यांनी काम पाहिले. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष डॉ. गणेश देवी, कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील, पन्नालाल सुराणा, भरत लाटकर, अतुल देशमुख, विश्वस्त डॉ. जहीर काझी यांनी नितीन वैद्य यांचे अभिनंदन केले.
नितीन वैद्य गेली तीन दशके मीडिया क्षेत्रात सक्रिय आहेत. स्टार हिंदी, झीटीव्ही या चॅनेलची सूत्रं त्यांनी सांभाळली आहेत. दे धक्का, धुडगूस, मुरंबा हे गाजलेले चित्रपट त्यांनी रिलीज केले आहेत. स्टार प्लस मधील त्यांच्या कारकिर्दीत चॅनेलवर सत्यमेव जयते हा अमीर खान यांच्या सोबतचा कार्यक्रम गाजला. त्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरच्या मालिका गाजल्या. महाराष्ट्र टाईम्सचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. समाजवादी आंदोलनात त्यांचा नेहमी सहभाग राहिला आहे.