उद्धव ठाकरेंवर टीका करण्याएवढी नितेश राणेंची उंची नाही; गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर
जळगाव : भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला असे त्यांनी म्हटले होते. नितेश राणे यांच्या या टीकेला आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांबाबत बोलावे एवढी त्यांची उंची नसल्याचा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनीच नारायण राणे यांना राजकारणात आणले, राजकारणात मोठे केले. शिवसेनेमुळे ते मोठे झाले. त्यामुळे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत बोलताना विचार करावा. नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंबाबत बोलण्याएवढी उंची नसल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. शनिवारी शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.
‘राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा याच रामदास कदमांना उद्धव ठाकरेंनी विरोधीपक्ष नेता बनवलं होतं. तेव्हा ते जिभेला हाड नसल्यासारखे आमच्यावर बोलायचे. आता कदमांसारख्या असंख्य शिवसैनिकांनी विचार करावा की, उद्धव ठाकरे तुम्हाला कसे वापरून घेतात. जेव्हा तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखे थुंकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामदास कदम. आज मी रामदास कदमांना सांगेन की, तुमची आज काय अवस्था झाली आहे. तुम्ही आज राजकारणामध्ये कुठेच नाहीत आणि राणे साहेब केंद्रात मंत्री आहेत. या फरकाचा रामदास कदमांनी विचार करावा. उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे. शिवसैनिकांनी या घटनेतून बोध घ्यायला पाहिजे’, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली होती. आता या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.