सचिन वाझे आणि वरुण सरदेसाई यांच्या संभाषणाची चौकशी करा : नितेश राणे
वाझेंनी सट्टेबाजांकडून उकळलेली खंडणी पुढे कुठे जाते?
मुंबई: सचिन वाझे यांनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून दीडशे कोटींची खंडणी मागितली होती. त्यामुळे या प्रकरणाचीही एनआयएने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. देशात चांगल्या हेतूने आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आमचं काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून वरुण सरदेसाई आहेत. वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय काय बोलणं झालं याची माहिती घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले. वाझेंना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या निमित्ताने सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. वाझे-वरुण सरदेसाईंची काय लिंक आहे त्याचाही तपास करण्यात यावा, सर्वच बाहेर येईल, असंही ते म्हणाले.
जगातील सर्वात मोठ्या श्रीमंत माणसाच्या घराबाहेर स्कॉर्पिओ ठेवली जाते. त्यात जिलेटिनच्या कांड्या असतात. यात वाझेंचा हात असल्याचं बोललं जातं. त्यामुळे हा सर्व प्रकार एकटा माणूस करू शकत नाही. यामागचा बोलविता धनी कोण आहे? याचीही चौकशी करण्यात यावी. जोपर्यंत ही चौकशी होत नाही, तोपर्यंत वाझेचा मास्टरमाइंड कोण आहे, त्याचा मायबाप कोण? आणि गॉडफादर कोण हे सुद्धा बाहेर येईल, असंही ते म्हणाले.