मुंबई : सैतानालाही लाजवेल अशा अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील ‘निर्भया’ची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. मुंबई पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. पण ज्या अमानुष पद्धतीनं तिच्यावर अत्याचार झाले होते त्याचं वर्णनही करता येणार नाही. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. अतिरक्तस्त्राव झाल्यानं पीडितेची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. आज सकाळी तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं कळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील आज रुग्णालयात तिच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पोहोचल्या होत्या.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ती व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापौर पेडणेकरांनी दिली होती. पण तिचा अखेर मृत्यू झाला आहे. याप्रकरणातील एक नराधम गजागाड असून यात आणखी काहींचा समावेश होता का याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यामुळे आता आरोपीविरोधात खूनाच्या गुन्ह्याचीही नोंद केली जाणार आहे.
मुंबईच्या साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना १० सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना ९ सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
आरोपीला कठोर शिक्षा : वळसे-पाटील
दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साकीनाका बलात्कार प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तिचा जबाब झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. जी काही कठोर शिक्षा आहे ती केली जाईलच, पोलीस खात्याला मी यासंदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये तपास सुरु आहेय. आणखी कोणी आरोपी आहेत का त्याचाही तपास घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात. या घटनेचा वेळोवेळी अहवाल मला द्या अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. मात्र आता पीडित महिलेचा मृत्यू झाल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
संतप्त प्रतिक्रिया
साकीनाका प्रकरणातील निर्भयाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तत्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. राजावाडी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हत्येचा गुन्हा दाखल करणार
दरम्यान, पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आता त्याच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आरोपीला फाशी द्या : मनीषा कायंदे
काल राजावाडीत जाऊन मी तिची माहिती घेतली होती. तिच्या आईला भेटले होते. तिच्या आईकडून माहिती घेतली होती. आज तिचा मृत्यू झाला हे अत्यंत वाईट झालं. या महिलेला दोन मुलं आहेत. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.
आरोपींना कठोर शिक्षा करा : नीलम गोऱ्हे
निर्भयाच्या घटनेनंतर कायदा बदलला, पण समाजाची मानसिकता बदलली नाही. सीसीटीव्ही आहेत, त्यात या घटना दिसल्या पाहिजे. आरोपींवर कारवाया झाल्या पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे माझा पाठपुरावा सुरू आहे. या आरोपीने इतर एमएमआर रिजनमध्ये काही गुन्हे केलेत का हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. शक्ती कायदा डिसेंबरमध्ये येत असला तरी आरोपीवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सांगितलं. फास्ट ट्रॅक शब्दही गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे यंत्रणा अधिक वेगवान करायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली.
कायद्याचा धाकच नाही : दरेकर
ही संतापजनक घटना होती. अशा घटनेवर काय प्रतिक्रिया द्याव्यात हे कळत नाही. अशा घटना वारंवार घडत आहेत. ही घटना घडल्याने मुंबईतील तरुणी रात्री-अपरात्री सुरक्षित कशा राहतील हा खरा प्रश्न आहे. पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी घटना घडत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. नराधमांना कायद्याचा धाक राहिला नाही. आपण कठोर कायदा राबवण्यात अपयशी ठरत आहोत, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं.
माफ कर ताई… : चित्रा वाघ
साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला. कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही. त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना. नाही वाचवू शकलो तुला, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू : नवाब मलिक
महिलेचा मृत्यू दुःखद आहे. लवकरात लवकर चार्जशीट दाखल करू. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू. नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल अशी शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.