मुंबई : राज्य सरकारने परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची विद्यार्थ्यांना परवानगी दिली आहे, त्यामुळे परीक्षेला मुकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. परीक्षेचा अर्ज भरण्याचे विलंब शुल्क माफ केलं आहे, नियमित शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतलं जाणार आहे.
येत्या १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. कोरोनाकाळात दहावीच्या परीक्षा दोन वर्षे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत, दोन वर्षे विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते. बारावीची परीक्षा येत्या ४ मार्चपासून सुरू होणार आहे. यात उशीरा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी विलंब शुल्क भरावे लागत होते, मात्र आता विलंब शुल्कही सरकारकडून माफ करण्यात आले आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून नियमीत शुल्क घेतले जाणार आहे. याबाबत सविस्तर लेखी आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं काढले आहेत.
याआधीच बोर्डाकडून आणि शिक्षणमंत्र्यांकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रक वेळीच जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना तयारीसाठी व्यवस्थित वेळ मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातल्या शाळा कोरोनामुळे बंद होत्या. मात्र मागील काही दिवसात कोरोनाचे आकडे कमी झाल्यानंतर राज्यातल्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता पुन्हा ओमिक्रॉनने विद्यार्थी आणि पालकांची धास्ती वाढवली आहे, मात्र १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांची धाकधूक कमी होणास निश्चितच मदत होणार आहे.