पावसामुळे परीक्षा मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या नव्या तारखा जाहीर
मुंबई: गुलाब चक्रीवादळामुळं मराठवाड्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली. मराठवाड्यातील शेतीचं नुकसान तर झालंच होतं. तर, औरंगाबाद आणि नांदेडमधील विद्यार्थी देखील पूरस्थितीमुळं परीक्षेला मुकले होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सकाळी सीईटी परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत पुन्हा परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता उदय सामंत यांनी परीक्षेच्या तारखा जाहीर करुन शब्द पाळला आहे. ९ आणि १० ऑक्टोबरला सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस वाढत आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने हजारो विद्यार्थ्यांची सीइटी होऊ शकली नाही कोरोना, पूर परिस्थिती , घरात वाईट घटना घडली असेल तर परत परीक्षा देत येईल. तांत्रिक अडचणी असतील तरी परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. विद्यार्थ्यांना डेंग्यू मलेरिया झाला असल्याने परीक्षा देता येणार नसेल तर त्याची परीक्षा परत देता येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे उद्या नवी जाहीर सूचना काढली जाईल. हॉल तिकीट, सेंटर पहिल्या परीक्षेचे वापरता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंच्या निर्देशानुसार ९ आणि १० ऑक्टोबरला सीईटी घेतली जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
औरंगाबादमध्ये २१५ विद्यार्थी परीक्षेला मुकले
औरंगाबादमध्ये पुराच्या पाण्यामुळे २१५ विद्यार्थी एव्हरेस्टमधील परीक्षेला मुकले असल्याचं समोर आलं होतं. पुलावरून पाणी वाहत असल्याने औरंगाबाद शहरासह परराज्यातील विद्यार्थी मुकले परीक्षेला होते. रस्ता नसल्याने बराच वेळ विद्यार्थी रस्ता सुरळीत होण्याची वाट पाहत होते. मुसळधार पावसामुळे पोहचू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या पुन्हा परीक्षा घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तातडीनं दखल घेत एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नसल्याचं म्हटलं आहे. पावसामुळं वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील, असं उदय सामंत यांनी जाहीर केल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
नांदेडमध्येही विद्यार्थी परीक्षेला मुकले
पावसामुळे नांदेड मध्ये काही विद्यार्थ्यांना एमएच सीईटी ची परीक्षा देता आली नाही. लातूर रोड येथील होरीजन स्कूल येथे एमएचटी सीईटी चे परीक्षा सेंटर होते. काल दिवसभरात दोन सत्रात जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती.बी. फार्मसी आणि डी. फार्मसीसाठी ही पूर्व परिक्षा होती . मात्र, काल पावसामुळे सकाळी ९ ते १२ या वेळेची परीक्षा होऊ शकली नाही. परीक्षा केंद्रावर जाण्याऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सेंटरमध्ये पोहोचता आलेले नाही. परीक्षा देण्यासाठी अनेक ठिकाणाहुन दूरवरून विद्यार्थी आले होते. सकाळी साडे सात वाजल्यापासून परीक्षा सेंटरच्या अलीकडेच येऊन विद्यार्थी अडकले होते. रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहनांची व्यवस्था झाली नाही. त्यामुळ काही विद्यार्थ्यांना सेंटर पर्यंत पोहोचता आलेच नाही. दरम्यान, परीक्षा व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांद्याची हजेरी घेऊन त्यांचे मोबाईल क्रमांक घेतले. नंतर या विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
२० ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होणार
या परीक्षांचा निकाल २० ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.