Top Newsराजकारण

उत्तर प्रदेशात भाजपला हरवण्यासाठी शरद पवारांनी शड्डू ठोकला !

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन

मुंबई : देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही आता पाच पैकी तीन राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा करत रणशिंग फुंकलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजवादी आणि इतर छोट्या पक्षांसोबर आघाडी करून निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच लवकरच उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार असल्याचंही पवार यांनी जाहीर केलं.

दरम्यान, उत्तर प्रदेशात जनतेला बदल हवा आहे. या निवडणूकीत जनता उत्तर प्रदेशात बदल घडवून आणेल याचा विश्वास आहे. उत्तर प्रदेशात एका धर्माच्या विचारसरणीवर चाललेले सरकार बाजूला सारणे महत्त्वाचे आहे. देशात सर्वधर्म समभावाची भावना अधिक बळकट करायची असेल तर उत्तर प्रदेशात भाजप सरकारला सत्तेतून बाहेर करावंच लागेल, असा एल्गार शरद पवार यांनी पुकारला आहे.

पाच राज्यात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार होते. तिथे काँग्रेससोबत पाच जागांवर निवडणूक लढवणार आहोत. तसंच गोव्यात काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे.

त्याचबरोबर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसोबत राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. उद्या एक मोठी बैठक होत आहे. तिथे आमचे प्रदेशाध्यक्ष के. के. शर्मा सहभागी होतील. उद्या लखनऊमध्ये जागावाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात आम्ही तिथे जाणार आहोत. उत्तर प्रदेशात परिस्थितीत मोठा बदल होत आहे. मला आनंद आहे की मेहंदी साहेब जे उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी गांधी, नेहरूंच्या विचाराने राजकारण केलं. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक साथीदार पक्षात येत आहेत’, असा दावाही पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय.

योगींच्या वक्तव्याचा समाचार

उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार आहे. उत्तर प्रगदेशात लोकांना बदल अपेक्षित आहे. तिथे जो एक सांप्रदायिक विचार मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तिथल्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं की ८० टक्के लोक आमच्यासोबत आहेत. २० टक्के फक्त आमच्यासोबत आहेत. अशाप्रकारचं वक्तव्य देशाच्या अल्पसंख्याक समुदाला ठेच पोहोचवणारं आहे. हे वक्तव्य एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभा देत नाही. देशात सेक्युलर विचार मजबूत करायचा असेल, एकतेला ताकद द्यायची असेल तर असा विचार, अशी भूमिका समाजहिताची नाही. त्यामुळे मला वाटतं की उत्तर प्रदेशातील जनता त्यांना धडा शिकवेल, असं मोठं वक्तव्य पवार यांनी केलंय.

उत्तर प्रदेशात भाजपचे १३ आमदार पक्ष सोडणार

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे माजी नेते सिराज मेहंदी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. सिराज मेहंदी यांच्यासोबत अनेक नेते आगामी काळात राष्ट्रवादीत येतील अशी आशा पवारांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत पवारांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

पवार म्हणाले की, उत्तर प्रदेशातील जनतेला राज्यात बदल घडवायचा आहे. येणाऱ्या काळात हा बदल नक्कीच घडेल. उत्तर प्रदेशातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समाजवादी पक्षातील प्रवेशावर बोलताना शरद पवारांनी भाजपावर भाष्य केले. १३ आमदार लवकरच समाजवादी पक्षात प्रवेश करतील असा दावा पवारांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून तुम्ही काम करताय…, शरद पवार फक्त हसले !

राज्यात सध्या मुख्यमंत्र्यांच्या जागी तुम्हीच खुर्चीवर बसून सरकार चालवत आहात अशी टिका केली जात आहे, असं पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मिश्किल हास्य करत विरोधकांकडून केली जाणाऱ्या अशा विधानांना फारसं महत्त्वं देण्याची गरज नसल्याचं म्हटलं. तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत म्हणत असाल तर परिवहन कामगारांची मोठा संघटना आहे. मी या प्रश्नात लक्षं घालावं असी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे कामगारांच्या पोटाचा प्रश्न असल्यानं मी त्यात लक्ष घातलं आणि चर्चेत सामील होणं म्हणजे सरकार चालवणं नव्हे, असं शरद पवार म्हणाले.

भाजप नेत्यांच्या टीकेबाबत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना त्यांच्या ज्ञानाबद्दल मी कौतुक करतो. एखाद्या कामगार संघटनेनं मला किंवा अजून कुणाला बोलावलं तर लोकशाहीत त्यांच्याशी चर्चा करण्याचा त्यांचा अधिकार आहे की नाही. त्या अधिकाराने त्यांनी चर्चा केली असेल तर त्यात काही वावगं नाही. मुख्यमंत्री हेच महाराष्ट्राचे निर्णय़ घेतात. त्यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून प्रत्यक्ष समोर यायला त्यांना मर्यादा होत्या. पण हे जरी असलं तरी परिवहन मंत्र्यांनी जी काही चर्चा झाली ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली असणार. महत्वाचे आणि धोरणात्मक निर्णय हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्रीच घेतात, असं पवार यांनी स्पष्ट केलंय.

पवार यांनी आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्याबाबत विचारलं असता, त्यांचा तो अधिकार आहे. त्याबाबत मी काही बोलू शकत नाही. पण मला वाटतं की विलीनीकरण याचा अर्थ हे सर्व कर्मचारी शासकीय कर्मचारी मानायचे. हे सूत्र मान्य केल्यानंतर हे एकापुरतं सीमित राहणार नाही अशी चर्चा आहे. अंतिम निर्णय माझ्या हातात नाही. हे सरकार काय करायचं ते करेल, असंही पवार यावेळी म्हणाले.

गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न

गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. गोव्यातील भाजप सरकार हटवण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. गोव्यात मंत्री आणि आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, मागील निवडणुकीत काँग्रेसला जनतेला पाठिंबा मिळाला होता. मात्र, भाजपने सत्ता स्थापन केली. आता भाजपमध्ये जे आमदार, मंत्री आहेत, ते काँग्रेसमधून आले आहेत. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिलीय. पुढील २ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल, असे शरद पवार यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विषय गंभीर

पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीबाबतही त्यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या प्रकरणाबाबत कालच सुप्रीम कोर्टाने एक स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे. त्यातून वास्तव काय असेल ते समोर येईल. मला वाटतं, पंतप्रधानपद हे एक इन्स्टिट्यूशन आहे. त्यासाठी केंद्र असेल किंवा राज्याने सुरक्षेची जबाबदारी घेतलीच पाहिजे. सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन केली असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही असेही शरद पवार म्हणाले. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विषय गंभीर असल्याचे मी मानतो, असेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button