मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूक पार पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि मंत्र्यांची महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी सर्वांचे आभार मानण्यात आले. तसंच राज्यातील दुकाने आणि व्यापाऱ्यांवरील कोरोना निर्बंध दूर करण्यावर चर्चा झाली. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या. आगामी काळात जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यासाठी ३६ जिल्ह्यांची जबाबजारी मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याचंही नवाब मलिक म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता मेळावे घेतले जाणार आहे. तसंच आगामी सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जातील, असंही मलिक यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर आघाडीबाबत स्थानिक पातळीवरील गणितं बघून निर्णय घेतले जाणार असल्याचंही मलिक म्हणाले.
भाजप आणि केंद्र सरकारच्या एजन्सींच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढणार
राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय नेत्यांना त्रास देण्याचे काम होत आहे. याविरोधात पूर्ण ताकदीने लढण्याची भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली. आयकर विभाग, ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय एजन्सींचा वापर करून भाजप महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक नेत्यांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास देण्याचे काम करत आहे. यामुळे या सर्व गोष्टींना खंबीरपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. केंद्रसरकारने किंवा भाजपने कितीही राष्ट्रवादीवर हल्ले केले किंवा केंद्रीय एजन्सींचा वापर केला तरी आमचे नेते किंवा कार्यकर्ता डगमगणार नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांच्या या विधानाची राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खिल्ली उडवली आहे. तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका. विरोधी पक्षनेतेपदही तितकंच मोठं आहे, असा चिमटा नवाब मलिक यांनी काढला आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना फडणवीसांना टोला लगावला. दोन वर्ष फिरत असताना मला असं वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी मुख्यमंत्रीच आहे असं मला वाटतं असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मला वाटतं दोन वर्ष होऊन गेली आहेत. पण ते मुख्यमंत्रीपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केलं पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढलं पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मोठं आहे. ते पद मुख्यमंत्रीपदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळलं पाहिजे, असा चिमटा मलिक यांनी काढला आहे.