राष्ट्रवादीने भाजप नेत्यांना नेमका सांगितला अनिल देशमुख, परमबीर सिंग यांचा पत्ता !
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. अनेकदा समन्स बजावूनही ईडीसमोर उपस्थित राहण्यास अनिल देशमुख तयार नाहीत. तसेच दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगही गायब असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता ईडीने अनिल देशमुख यांना शोधण्यासाठी थेट सीबीआयची मदत मागितली आहे. तर, अनिल देशमुख कुठे आहेत, याबाबत राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
अनिल देशमुख, परमबीर सिंग कुठे गायब आहेत हे राष्ट्रवादीने जाहीर करावे, असे आवाहन भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले होते. अनिल देशमुख यांच्यासह परमबीर सिंगही गायब आहेत, असे सांगत गृह विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दरेकरांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, ते त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, राज्यात आहेत, देशात आहेत. पण तरीही ते फरारी आहेत का? हद्दपार आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्यांच्या पक्षाचे नेते हद्दपार आहेत, ज्यांच्या पक्षाचे लोक फरारी आहेत त्यांनी याप्रकरणी प्रश्न विचारू नयेत, असा पलटवार मलिक यांनी यावेळी केला.
स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मीडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत? त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चोर्या-नंतर बहाणे’ अशाच वर्गवारीत मोडणारा आहे, अशी टीका दरेकर यांनी केली होती.