मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. ३१ मार्चला शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. शरद पवारांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
रुग्णालयात दहा दिवस उपचार
खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करून पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. बाबांना पित्ताशयाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक आहे. त्यांना 10 दिवसांसाठी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. त्यानंतर ते घरीच विश्रांती घेतील. त्यामुळे त्यांचे आजपासून सुरु होणारे नियोजित कार्यक्रम आणि दौरे पुढील 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद, असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे.
बंगालचा प्रचार दौराही रद्द
शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले. ही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींसाठी निराशादायक गोष्ट मानली जात आहे . शरद पवार 1 एप्रिलपासून तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणार होते. पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसाठी प्रचार करु नये, अशी विनंती काँग्रेसने केली होती. मात्र, ही विनंती फेटाळत शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या मदतीसाठी जायचे ठरवले होते. ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालची लढाई कधी नव्हे इतकी अटीतटीची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासारखा खंदा नेता आणि भाजपच्या अवाढव्य प्रचारयंत्रणेचा सामना करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय स्तरावरील मोदीविरोधकांची साथ मिळण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा ममता बॅनर्जी यांना प्रचारात फायदा होण्याची शक्यता होती. मात्र, आता ऐन लढाईच्यावेळी तृणमूल काँग्रेसला शरद पवारांची रसद मिळणार नसल्याने ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
एन्डोस्कोपी म्हणजे काय?
एन्डोस्कोपी ही अशी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये पोटावर एक छिद्र करुन त्यातून दुर्बिण (एन्डोस्कोपी) आत टाकली जाते. कार्बन डाय ऑक्साईड (सीओ2) या वायूने पोट फुगवलं जातं आणि एका प्रकाशस्त्रोताने पोटाच्या आतील निरीक्षण केलं जातं. त्याबरोबर जर काही शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली तर नाभी व्यतिरिक्त २-३ छिद्र करुन त्यातून उपकरणं आत (पोटात) टाकून शस्त्रक्रिया केली जाते.