मोदी सरकारचे यापूर्वीचे निर्णयही नजरचुकीचेच का; जयंत पाटलांचा खोचक सवाल
मुंबई: अल्पबचत योजनांच्या व्याजदर कपातीच्या निर्णयावरून मोदी सरकारने घुमजाव केल्याचे पडसाद राज्यातही उमटत आहेत. केंद्रातील भाजप सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली असून कोट्यवधी ठेवीदारांची केंद्र सरकारने थट्टा केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले होते का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थित केला.
केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांवरील (small saving schemes) व्याजाच्या दरात कपात केली. त्यानंतर लगेचच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कपात मागे घेत यु-टर्न घेऊन सारवासारव केली होती. यावर जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे निशाणा साधला. अल्प बचतीच्या सरकारी योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आदेश हा अधिकाऱ्यांच्या नजरचुकीमुळे काढला गेला, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी दिले आहे. सीतारामन पुढील आर्थिक वर्षासाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदर ‘जैसे थे’ राहणार आहेत. नजरचुकीने काढले गेलेले हे आदेश मागे घेण्यात येत आहेत, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
मोदी सरकारने बुधवारी रात्री अल्पबचत योजनांवरील (Small Savings Scheme) व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे काल रात्रीपासून या निर्णयाची प्रचंड चर्चा रंगली होती. अखेर रात्रभरात चक्रे फिरली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सकाळी 7.54 मिनिटांनी ट्विट करून हा आदेश रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांचा जीव भांड्यात पडला.