मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपबाबत भावी सहकारी असं वक्तव्य केलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाले होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील सांगण्यास संजय राऊत यांनी नकार दिला. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. पण ही आतली चर्चा आतमध्ये. बाहेर का सांगू?, असा सवाल करत संजय राऊत यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबादमधील कार्यक्रमात भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली होती. मुख्यमंत्री म्हणाले, मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केला होता. मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ गुगलींने सगळेच अवाक् झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर महाविकास आघाडीत पडसाद उमटत असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये नापसंती असल्याची चर्चा आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा काही निरोप घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादेत केलेल्या विधानावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच नापसंती व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे नापसंती व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती मिळतेय. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असताना अशा वक्तव्यांची गरज काय? असा सवाल पवार यांनी केल्याचं सूत्रांकडून कळत आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. गणेशोत्सव सुरू आहे. उद्या विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणपतीचं दर्शन घेतलं. थोड्यावेळ गप्पा मारल्या. गणपती सुद्धा राजकारण्यांचा गुरू आहे. राजकारण्यांनी गणपतीकडून अनेक गोष्टी शिकव्यात. मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली, काय बोललो… या चर्चा आतमध्ये. त्या बाहेर कशाला सांगायच्या?, असं राऊत म्हणाले.
कमालीची शांतता आहे, कोणतंही वादळ नाही
मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाचे तीन पक्षात पडसाद उमटले आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर पडसाद वगैरे काही नाही. सर्व काही शांत आहे. अलबेल आहे. कोणतंही वादळ नाही. कमालीची शांतता आहे. त्या विधानाने कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या. पण हे सरकार तीन वर्ष चालणार आहे, असं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे नुसतेच मुख्यमंत्री नाहीत. ते आमचे पक्षप्रमुख आहेत. तसेच ते माझे व्यक्तिगत मित्रंही आहेत. त्यामुळे आमच्यात गप्पा झाल्या. पक्षाच्या संदर्भातही चर्चा झाल्या. त्यांना वेळ असेल तेव्हा मी जाऊन भेटतो त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करत असतो, असंही त्यांनी सांगितलं.
चंद्रकांतदादांनी दोन दिवसांची मुदत दिली होती. ती संपली आहे. दोन दिवसात काही तरी होईल असं ते म्हणाले. होते. मला वाटतं त्यांना एक्सटेंन्शन द्यावं लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला. तर मोदी आणि ठाकरे कुटुंबांचे संबंध फार जुने आहेत. चांगले संबंध आहेत. व्यक्तिगत संबंध तसेच राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पंजाबमध्ये काही होत असेल तर काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्याच्या बेडरूममध्ये पाहण्याची गरज नाही. त्यासाठी एका राष्ट्रीय पार्टीची नियुक्ती केली आहे. ते लोक हेच काम करत असतात, असा चिमटाही त्यांनी काढला.