मेरे पुतले जला लो तुम ये शोला कम नहीं होगा; मलिकांचे शायरीतून भाजपला प्रत्युत्तर
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांना पाठिंबा देण्यासाठी नवाब मलिकांच्या विरोधात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मंत्रालया बाहेर जोरदार आंदोलन करत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मलिकांचा पुतळा जाळला. या अनुषंगाने नवाब मलिकांनी ट्वीटद्वारे शायरी शेअर करून भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
मलिका ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘मैं सच्चाई पे हूँ और सच का जज़्बा कम नहीं होगा, मेरे पुतले जला लो तुम ये शोला कम नहीं होगा।’
मैं सच्चाई पे हूँ और सच का जज़्बा कम नहीं होगा,
मेरे पुतले जला लो तुम ये शोला कम नहीं होगा।— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 10, 2021
यापूर्वीच्या ट्वीटमध्येही मलिकांनी एक शायरी शेअर केली होती. ते म्हणाले, ‘होश उनके यूँ उड़े कि चेहरे फीके पड़ गए, हमने तो बस ये किया उन्हें आईना दिखा दिया!’
होश उनके यूँ उड़े कि चेहरे फीके पड़ गए ,
हमने तो बस ये किया उन्हें आईना दिखा दिया !— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 10, 2021
दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. गुन्हेगारांना अभय दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर मलिकांनी केला. तसेच फडणवीस यांनी बनावट नोटांचे प्रकरण दाबल्याचा आरोप देखील मलिकांनी यावेळी केला. यामुळे राज्यातील ठिकठिकाणी मलिकांविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी थेट मंत्रालयाला धडक दिली. यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामुळे मंत्रालय परिसरात वातावरण तापले होते. यादरम्यान पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.