मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्राचे प्रकरण हायकोर्टात आहे. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच नवाब मलिकांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करुन काही कागदपत्रे देण्यासाठी परवानगी मागितली आहे. नवाब मलिकांच्या प्रतिज्ञापत्रामुळे वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांनी जातप्रमाणपत्राबाबत केलेल आरोप खोटे असल्याचे वानखेडेंच्या वडिलांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला होता. मलिकांच्या आरोपाविरोधात वानखेडे यांच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच मलिकांविरोधात १.२५ कोटींचा दावा ठोकला आहे. या प्रकरणी कोर्टात गुरुवारी सुनावणी करण्यात येणार आहे. नवाब मलिक यांचे आरोप खोटे असल्याचा दावा समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी केला आहे. यावर कोर्टाने मलिकांचे वक्तव्य खोटं ठरवण्यासाठी खरे कागदपत्र द्या असे निर्देश दिले होते. तसेच न्यायालयाने काही दिवसांचा वेळ दिला होता तो वेळ गुरुवारी १९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.
ज्ञानदेव वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्रावर हायकोर्टात सुनावणी होण्यापूर्वीच नवाब मलिक यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. नवाब मलिक यांनी वानखेडेंचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर काही कागदपत्रे सादर करण्याची परवानगी मागितली आहे. या कागदपत्रांमुळे नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. तसेच नवाब मलिकांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचे कागदपत्र मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणीदरम्यान काय निर्णय घेण्यात येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.