आरोग्यराजकारण

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ‘पुराण’ बंद करा : नवाब मलिक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी योगगुरू रामदेव बाबांवर टीका केली आहे. रामदेव बाबांसारखे लोक गोमूत्र, गोबर आणि कोरोनिल काढतात. अ‍ॅलिओपॅथीवर संशय घेतात. त्यामुळे आयएमएने रामदेव बाबांना नोटीसा पाठवल्या पाहिजेत, असं सांगतानाच गोबर, गोमूत्र आणि रामदेव हे पुराणच आता बंद करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रामदेवबाबांपासून ते केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशात कोरोनाचं संकट कायम आहे. अशावेळी गोमूत्र प्यायला सांगितलं जात आहे. रामदेव सारख्यांच्या औषधांच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री जातात. हे नियम आणि कायद्याला धरून नाही. त्याचा आरोग्य मंत्रालयाने विचार केला पाहिजे. ज्या औषधांना वैद्यकीय मान्यता नाही, त्याविरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे. जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असं मलिक म्हणाले.

लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील

राज्यातील लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर मलिक यांना विचारलं असता, राज्यात ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे अजून वेळ आहे. पण लॉकडाऊनचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं ते म्हणाले. लोकांनी प्रशसानाला सहकार्य केलं आहे. त्यामुळे आकडे कमी होताना दिसत आहेत. नागरिकांनी आणखी सहकार्य करावं. आकडे अधिक घटल्यास मिशन बिगीन अगेनचा सरकार विचार करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्रातील मोदी सरकारला ७ वर्षे होत आहेत. त्यावरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजप आणि मोदी सरकारला सगळे ओळखून आहेत. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सेलिब्रेशन न करण्याचं आवाहन केलं आहे. पण त्यांना कार्यकर्त्यांना असं का सांगावं लागलं? त्यांचे कार्यकर्ते सेलिब्रेशन करणार होते का?, असा सवाल त्यांनी केला. गेल्या सात वर्षात जीएसटी, नोटबंदी आणि महामारी आली. बेरोजगारी आली. नोकऱ्या गेल्या. लोक देशोधडीला लागले, असं सांगत मलिक यांनी केंद्र सरकारच्या सात वर्षाच्या कारभाराचा पंचनामा केला.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्र आणि केरळलाही आर्थिक मदत देण्याचं ट्विट केलं होतं. पण नंतर ते त्यांनी डिलीट केलं. भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता. आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय, असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधानांनी गुजरातची हवाई पाहणी केली. वादळामुळे अनेक राज्यांचं नुकसान झालं. पण पंतप्रधानांनी एकाच राज्याला मदत केली. इतर राज्यांबाबत दुजाभाव करणं योग्य नाही, असं सांगतानाच आता केंद्राचं पाहणी पथक कधी येईल माहीत नाही. त्यामुळे राज्यांना मदत कधी मिळेल हे सुद्धा सांगता येत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान भावूक झाले होते. त्यावरही मलिक यांनी टीका केली. पंतप्रधान भावूक झाले. त्यावर लोक प्रश्न विचारत आहेत. इतरवेळी मास्क आणि गमछा घालून ते बोलतात. मात्र त्या दिवशी मास्क न घालता बोलत होते. त्यामुळे मोदी भावूक झाले हे ठरवूनच केल्याचं म्हटलं जात आहे, असा चिमटा त्यांनी काढला. कोरोनाचं संकट वाढलं आहे. औषध नाही, लस नाही अशी परिस्थिती आहे. हे असं ‘इंडियन मॉडेल’ कोणी स्वीकारणार नाही. हे मॉडल देश स्वीकारणार नाही, असंही ते म्हणाले.

रिझर्व्ह बँकेने केंद्राला पैसा देण्याबाबत अनेकांचा आक्षेप आहे. बँकेकडून सरकार वारंवार पैसा घेत आहे. देश आर्थिक संकटात आहे आणि पैसे हवे आहेत हे जाहीर न करताच पैसे दिले जात आहे. हा प्रकार सुरू राहिल्यास अनेक बँका अडचणीत येतील. देशाची आर्थिक स्थिती बिघडू शकते, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button