शिक्षण

नाशिकची लाचखोर महिला शिक्षणाधिकारी अखेर निलंबित

नाशिक : आठ लाखाच्या लाचखोरी प्रकरणात अखेर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं निलंबन करण्यात आलं आहे. वैशाली यांना आजच अटी-शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यानुसार वैशाली यांना दर सोमवारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावावी लागणार आहे. या प्रकरणी कोर्टात सध्या खटला सुरु आहे. वैशाली यांच्या वकिलांनी १४ ऑगस्टला देखील जामीन अर्ज केला होता. पण त्यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती. याशिवाय ठाणे लाचलुचपत विभागाने अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निकाल दिला होता.

वैशाली वीर-झनकर यांचं निलंबन करण्यात यावं असा प्रस्ताव यापूर्वी ३ वेळा पाठवण्यात आला होता. त्यानंतर आज मात्र त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. शासनाच्या कायद्यानुसार झनकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. ८ लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या या कारवाईमुळे वैशाली वीर-झनकर यांना मोठा धक्का बसला आहे.

शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी ८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलं. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांनी एका संस्था चालकांकडे सरकारकडून मिळणारं २० टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. संस्था मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी करत होती. ही ऑर्डर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेकडून सुमारे 9 लाख रुपयांची लाच मागितली. यावेळी तक्रारदारांनी तडजोडीअंती ८ लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने झनकर यांना अटक केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button