नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार अमरजीत सिन्हा यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे. या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नसले तरी देखील मार्चनंतर दुसऱ्या सल्लागाराने राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
पीएमओच्या एका अधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर याची माहिती दिली आहे. सिन्हा हे बिहार केडरचे (१९८३ बॅच) आयएएस अधिकारी होते. त्यांना गेल्या वर्षीच फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
देशातील अतिमहत्वाच्या अशा पंतप्रधान कार्यालयातील गेल्या काही महिन्यांतील हा दुसरा राजीनामा आहे. पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. सिन्हा यांनी मार्चमध्ये राजीनामा दिला होता. अमरजीत सिन्हा यांना भास्कर खुल्बे यांच्यासोबत सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तीन दशकांच्या सेवेत त्यांनी ग्रामीण विकास, शिक्षण आणि पंचायत राजसारख्य़ा महत्वाच्या मंत्रालयांमध्ये महत्वाची पदे सांभाळली होती. दोन्ही रिटायर्ड अधिकारी होते. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. मात्र, सिन्हा यांनी मुदत संपण्याआधीच राजीनामा दिला आहे. सिन्हा हे पीएमओमध्ये सामाजिक क्षेत्राशी संबंधित योजनांचे काम पाहत होते. ते २०१९ मध्ये ग्रामीण विकास सचिव पदावरून निवृत्त झाले होते. यानंतर त्यांना पीएमओमध्ये नियुक्त करण्यात आले होते.