नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून जगात तसेच देशात कोरोना महामारीमुळं संकट उभं राहिलं आहे. या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचं चित्र देशात पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा जीव गेला. देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या विविध घटनांमध्ये एका इंग्लिश वृत्तवाहिनीने घेतलेल्या सर्व्हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ टक्क्यावरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं आहे.
इंडिया टूडे मूड ऑफ द नेशन पोलच्या सर्व्हेतून हे समोर आलं आहे. या सर्व्हेत विचारण्यात आलं होतं की, भारतासाठी पुढील पंतप्रधान कोण असावा? यावर ऑगस्ट २०२१ मध्ये फक्त २४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली. तर जानेवारी २०२१ मध्ये याच प्रश्नाला ३८ टक्के लोकांनी मोदींच्या नावाला पसंती दिली होती. तर मागील ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला ६६ टक्के लोकांनी पसंती दिली होती. भाजपाचे फायर ब्रँड नेते असतानाही नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाली असली तरी भाजपाशी संबंधित दोन बड्या नेत्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
पोलनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये पंतप्रधानपदासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाला ११ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जानेवारी २०२१ मध्ये हा आकडा १० टक्के इतका होता तर ऑगस्ट २०२० मध्ये केवळ ३ टक्के लोकांनीच योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधानपदासाठी पसंती दिली होती. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये ७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ८ टक्के तर ऑगस्टमध्ये केवळ ४ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी अमित शहांच्या नावाला पसंती दिली होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावं पाहिली तर राहुल गांधी यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये १० टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ७ टक्के आणि ऑगस्ट २०२० मध्ये ८ टक्के लोकांनी पसंती दाखवली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ४ टक्के तर ऑगस्ट २०२० मध्ये केवळ २ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली होती. तर पश्चिम बंगालच्या आक्रमक नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. ऑगस्ट २०२० केवळ २ टक्के लोकांनी ममता बॅनर्जींनी पंतप्रधान व्हावं यासाठी पसंती दर्शवली होती. परंतु जानेवारी २०२१ मध्ये हा आकडा दुप्पट होऊन ४ टक्के झाला तर ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के झाला आहे.
या पोलनुसार, राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांच्या लोकप्रियतेत किंचित वाढ झाली आहे. तर सोनिया गांधी यांची लोकप्रियता कमी झाली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये २ टक्के लोकांनी प्रियंका गांधींच्या नावाला संमती दिली. तर ऑगस्ट २०२१ मध्ये ४ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. Mood of the Nation August 2021 हा सर्व्हे १० जुलै ते २० जुलै यादरम्यान करण्यात आला आहे. या पोलमध्ये देशातील १९ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघ आणि २३० विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे.
११ लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचे फक्त २
देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आणि कामगिरीचं सर्वेक्षणही इंडिया टुडे या माध्यम समुहाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यामध्ये, भाजपला चांगलाच झटका बसला आहे. देशातील सर्वात लोकप्रिय असलेल्या ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री हे भाजपेतर पक्षाचे आहेत. योगी आदित्यनाथ यांनाही केवळ २९ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. तर, देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा समावेश आहे.
देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत एम.के. स्टॅलिन यांना पहिली पसंती मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर नवीन पटनायक यांना स्थान मिळाले आहे. केरळचे पिनराईन विजयन, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींना अनुक्रमे ३, ४ आणि ५ वे स्थान मिळाले आहे. अकरा जणांच्या या यादीत भाजपचे केवळ २ मुख्यमंत्री असून हेमंत बिस्वा आणि योगी आदित्यनाथ यांना स्थान मिळाले आहे.