Top Newsराजकारण

नारायण राणेंच्या मित्राला ठाकरे सरकारकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंच्या मित्राला राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात गेली तीन दशकांहून कार्यरत असलेले ज्येष्ठ बँकींग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने नवे सहकार मंत्रालय स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर अनास्कर यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. राज्य सरकारने ही नियुक्ती करताना त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. विद्याधर अनास्कर यांनी आतापर्यंत सहकार क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर जसे प्रशासक आहेत तसेच ते नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बँक्स्चे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र अर्बन बँक्स् फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. पुणे येथील विद्या सहकारी बँकेचे ते कार्यवाहक संचालक आहेत. याशिवाय रिझर्व्ह बँकेने प्रत्येक राज्यांमध्ये नागरी सहकारी बँकांसाठी स्थापन केलेल्या `टास्क फोर्स’चे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि जम्मू-काश्मिर या राज्यांचे सदस्य आहेत. रिझर्व्ह बँकेच्या स्थायी सल्लागार समितीचे ते गेल्या १२ वर्षापासून सदस्य आहेत.

सहकार परिषद काय काम करते?

सहकारी चळवळीशी संबंधित सर्व बाबींवर राज्य सरकारला सल्ला देणं. सहकारी चळवळीचा आढावा घेणं, राज्यातील सहकारी संस्थांच्या कार्याचा समन्वय साधण्याचे मार्ग सुचविणे. सहकारी संस्थांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्ग आणि उपाय सुचविणे. राज्य सरकार परिषदेकडे निर्देशित करेल अशा सर्व बाबींवर राज्य सरकारला अहवाल देणे. राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना आणि धोरणे यांची शिफारस करणे. समाजातील मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या सहकारी चळवळीचा विकास करण्यासाठी असलेल्या विद्यमान योजनांचे मुल्यांकन करणे व नवीन योजना सुचविणे. सहकारी पध्दतीद्वारे आर्थिक विकास करण्याच्या विशेष परियोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला सल्ला देणे. विभागामार्फत किंवा खास स्थापन केलेल्या मंडळामार्फत उपरोक्त कोणत्याही प्रयोजनासाठी अभ्यास करण्याचं काम हाती घेणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button