राजकारण

खा. नारायण राणे आज दिल्लीला रवाना होणार; केंद्रात मंत्रिपद जवळपास निश्चित

नवी दिल्ली/मुंबई: नारायण राणेंना दिल्लीहून तातडीचं बोलावणं आल्याची माहिती आहे. त्यामुळे राणे मंगळवारी दिल्लीला रवाना होत आहेत. ते दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ७ जुलैला होणार आहे. महाराषट्रातून नारायण राणे, हिना हावित यांच्या नावाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातील १७ ते २२ मंत्री ७ जुलैला शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकामागून एक बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. यासाठी शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडलं. शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलानंदेखील भाजपची साथ सोडली. त्यामुळे दोन मंत्रिपदं रिक्त झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला असलेलं मंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. या पदासाठी राज्यसभेचे खासदार नारायण राणेंची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. मोदी सरकार २.० मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठ मंत्र्यांकडे अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी कमी करण्यासाठी पुढील दोन दिवसांत मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राणेंनी या विषयावर काम केलं. आताही ते या मुद्द्यावरून राज्य सरकारवर घणाघाती टीका करत आहेत. याशिवाय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. त्याचा विचार करूनही राणेंना मंत्रिपद देण्यात येईल असं बोललं जातं. राणे यांच्यासोबत रणजीत नाईक निंबाळकर आणि हिना गावित यांच्या नावांचीदेखील मंत्रिपदासाठी चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button