कोकणवासीयांच्या सुविधांसाठी नारायण राणेंनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट
नवी दिल्ली: केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेते १६ ऑगस्टपासून राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्र सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवितानाच राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्र सोडणे, अशी या यात्रेची दुहेरी रणनीती असेल, असे सांगितले जात आहे. यातच आता केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे कामाला लागले असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकणवासीयांसाठी ३ महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
नारायण राणे यांनी कोकणवासियांना फायदेशीर ठरू शकतील, असे तीन प्रस्ताव अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडले. यामध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जादा ट्रेन सोडण्यात याव्यात. तसेच कोकण रेल्वेमार्गावर ट्रॅकलगत नारळाची झाडे लावण्यासाठी जमीन द्यावी आणि कुडाळ तालुक्यात टू लेन रोडला परवानगी मिळावी, अशा तीन मागण्या नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या. यानिमित्ताने नारायण राणे यांनी कोकणाच्या विकासाच्या माध्यमातून राजकीय फासे टाकायला सुरुवात केल्याची चर्चा आहे.