राणे कुटुंबियांकडून शरद पवारांची ब्रीच कँडीत विचारपूस
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंगळवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी पवारांची भेट घेतली. नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते.
पक्ष वेगवेगळे असले, वैचारिक भूमिका भिन्न असल्या, तरी एखाद्या राजकीय नेत्याच्या आजारपणात त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच पाहायला मिळते. कोणे एके काळी आघाडीमध्ये शरद पवारांसोबत राहिलेले नारायण राणे हीच संस्कृती जपताना दिसत आहेत. त्यामुळेच पवारांच्या शस्त्रक्रियेनंतर राणेंनी सहकुटुंब जाऊन त्यांची विचारपूस केली.
मोदी ते राज ठाकरे, पवारांना फोन
शरद पवार ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च नेते आहेत. पवारांना पित्ताशयाचा त्रास जाणवल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बहुतांश बड्या राजकारण्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.