राजकारण

देशाची स्मशानभूमी होण्यास मोदी, भाजप नेत्यांचा अहंकार कारणीभूत : नाना पटोले

अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने देशाची स्मशानभूमी केलीय. त्यांच्या अहंकारामुळे देश स्मशानभूमी बनला असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. ते आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी त्यांनी केलीय. त्यानंतर अलिबाग येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पटोले यांनी आज रायगडमध्ये चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. अलिबागमधील नवगाव इथं मच्छिमारांसोबत संवाद साधत नुकसान झालेल्या बोटी, त्याचबरोबर वरसोली इथं रमेश नाईक यांच्या नारळाच्या बागेची, वावे पडलेल्या घराचीही त्यांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी नुकसानाचा अहवाल तातडीने शासनाला पाठवण्याची मागणी केलीय. यावेळी त्यांच्यासोबत हुसेन दलवाई, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप आदी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक बनलंय. अशावेळी म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशीसारख्या नव्या आजाराने तोंड वर काढलंय. म्युकरमायकोसिसमुळेही अनेकांचे जीव जात आहेत. त्यावरुन यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची थट्टा करण्याचं काम केंद्र सरकारनं आणि भाजपनं केलं. भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली आहे. केंद्र सरकारचा ढिसाळपणा, नियोजन शून्यता, जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या नियमांचं पालन न करणं, यामुळेच देश स्मशानभूमी बनलीय. देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधानांवर जागतिक पातळीवर टीका होत असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पटोले यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलंय. विदूषक कोण हे पश्चिम बंगाल आणि देशानं दाखवून दिलं आहे. खरा हिरो कोण आहे हे ही जनताच ठरवेल, असं पटोले म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तिसरी लाट भयंकर आहे. त्यामुळे या लाटेत लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला मोदींनी या डॉक्टरांना दिला आहे. दरम्यान, ‘मोदी भावूक होऊ शकतात यावर विश्वास बसत नाही. मोदींचं खेला होबे सुरु होतं. देशाला स्मशान केलं आणि आज ते भाऊक होत असतील यावर विश्वास बसत नाही’, असा जोरदार टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हाणला.

पंतप्रधान मोदींची प्रतिमा ढासळली आहे. त्यामुळे प्रतिमा सुधारण्यासाठी अश्रू ढाळत असतील तर जनता मान्य करणार नाही. बनारस मॉडेलमध्ये गंगेत मृतदेह वाहत आहेत. त्यांचं ते स्वप्न असेल तर त्यांना कळायला हवं की कुत्र्या-मांजरासारखं लोकांना मरायला सोडलंय. त्यांचा हा पॅटर्न आम्ही महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीकाही पटोले यांनी मोदींवर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button