मुंबई : मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी कासावीस झाली आहे. पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना भाजपवर शरसंधान साधलं. सत्तेच्या बाहेर गेल्याने भाजप कासावीस झाली आहे. पाण्यातला मासा बाहेर निघतो आणि तडफडतो तशी भाजपची अवस्था झाली आहे. त्यामुळे ते येनकेन प्रयत्न करताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी तर १५ ऑगस्टला मंत्रालयावर झेंडा फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांना सत्तेची लालसा किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येतं. लोकं मेली तरी त्यांना त्याचं काही पडलेलं नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
हिंदू-मुस्लिम वाद लावण्याचा प्रयत्न
ईदच्यावेळीही बंधनं आणली होती. बकरी ईदच्यावेळी मुस्लिमांमध्येही रोष निर्माण झाला होता. पण राज्य सरकार नरमले नाही. त्यांना प्रतिकात्मक कुर्बानी देण्याचं आवाहन करण्यास सांगितलं होतं. तसं पत्रकही राज्य सरकारने काढलं होतं. हे माहीत नसेल तर त्याचीही एक कॉपी पाठवतो. पण भाजप मुस्लिम आणि हिंदू हा वाद सातत्याने करत आहे. मानवतेला कलंक लावण्याचं पाप भाजप सातत्याने करत आहे. ते त्यांनी बंद करावं, असं ते म्हणाले.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देशातील अनेक राज्यात मंदिरं सुरू असल्याचं सांगितलं होतं. मुनगंटीवार यांच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने स्पेशल पत्रं काढलं आहे. त्याची कॉपी मी त्यांना पाठवतो. ज्या राज्यांचा ते उल्लेख करतात त्या राज्याचा केंद्राच्या पत्रात उल्लेख नाही. त्याचं त्यांनी वाचन करावं, असा चिमटा पटोले यांनी काढला.