अर्थ-उद्योग

आंबा खरेदीसाठी ‘मायको’ची ऑनलाईन बाजारपेठ; क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे प्रथमच व्हर्च्युअल सफर

देवगड, राजापूर, विजयदुर्ग पट्ट्यातील जीआय टॅग हापूस शेतातून थेट ग्राहकापर्यंत

मुंबई : ‘कोकणातील शेतातून थेट ग्राहकाच्या घरापर्यंत’ अस्सल हापूस आंबा पोहचवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘मायको’ या मँगोटेक प्लॅटफॉर्मने आंबा खरेदीसाठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात आंबा प्रेमींना घरबसल्या एका क्लिकवर देवगड, राजापूर, विजयदुर्ग या पट्ट्यात लागवड करण्यात आलेला हापूस ऑर्डर करता येईलच. पण या ऑनलाईन व्यासपीठाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक आंबा पेटीसोबत दिला जाणारा क्युआर कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना त्यांनी मागविलेला आंबा कोकणातील कोणत्या शेतात लागवड करण्यात आला, शेतकऱ्याचे नाव, त्याची आंबा बाग, लागवडीसाठी केलेले परिश्रम, अनुभव हे सर्व व्हिडिओद्वारे पाहता येणार आहे. आंब्याची लागवड करताना शेतकऱ्याने केलेली मेहनत एका क्युआर कोडद्वारे दर्शविणारा ‘मायको’ हा पहिलाच मँगोटेक प्लॅटफॉर्म आहे.

कोकणातील वातावरणात वाढता उष्मा, अनियमित हवामानामुळे यंदा हापूस आंब्याचे उत्पन्न काहीसे घटले असताना कोरोना साथचे प्रमाण पुन्हा वाढल्याने हापूसच्या व्यापाराला फटका बसत आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा योग्य आर्थिक मोबदला मिळावा आणि आंबा प्रेमींना नैसर्गिकरित्या पिकवलेल्या हापूसची गोडी चाखता यावी यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’ने पुढाकार घेतला आहे. राजश्री यादवराव, सुप्रिया मराठे आणि सुनयना रावराणे या तीन महिला उद्योजकांनी एकत्र येत कोकणातील १०० शेतकऱ्यांना एकजूट करत ‘मायको’ या देशातील पहिल्या मँगोटेक प्लॅटफॉर्मची निर्मिती केली. ‘मायको’च्या ऑनलाईन खरेदी माध्यमातून ग्राहकांना संपूर्णतः नैसर्गिकरित्या पिकवलेला, कोणतीही भेसळ नसलेला आणि जीआय मानांकन प्राप्त हापूसचा आस्वाद घेता येईल. आंबे घरी पोहोचविताना सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. सोसायटी आणि कॉर्पोरेट ठिकाणी ५० किंवा त्याहून अधिक पेट्यांची मोठी ऑर्डरही ‘मायको’द्वारे केली जात आहे. ग्राहकांना चांगल्या प्रतीचे आंबे मिळावेत, त्यांचा दर्जा कायम रहावा यासाठी विशेष तापमानाच्या वातानुकूलित गाड्यांमधून हे आंबे मुंबई, एमएमआर प्रदेश, पनवेल, नाशिक, नागपूरसह महाराष्ट्रातील आदी भागात पोहचविले जात आहेत.

”आंबा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनावे, ग्राहकांना कोणतीही भेसळ नसलेल्या अस्सल हापूसची चव घेता यावी यासाठी ‘मायको’ या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली. सध्याच्या निर्बंधाच्या काळात ग्राहकांना आंबा ऑनलाईन खरेदी करता यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ” असे ‘मायको’च्या सह संस्थापक राजश्री यादवराव म्हणाल्या. ”आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील निर्यातीच्या माध्यमातून आंबा देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देतो. असे असले तरी, याचे उत्पादन करणारे शेतकरी एका ठराविक नफ्याच्या पलीकडे गेलेले नाहीत. मात्र आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे हे ‘मायको’चे ध्येय आहे” असेही त्या पुढे म्हणाल्या. ”आंब्याच्या सीझनमध्ये बाजारपेठेत अनेकदा भेसळयुक्त, रासायनिक फवारणी करून पिकवलेले आंबे पहायला मिळतात. पण ही सर्व पद्धती मोडून काढत मुंबई, महाराष्ट्रसह जगभरातील आंबा प्रेमींना कोणतीही भेसळ नसलेला अस्सल हापूसचा आस्वाद देणे यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. ‘मायको’च्या माध्यमातून आंबा विक्रीच्या पारंपरिक पद्धतीत बदल पहायला मिळत आहे.” असे ‘मायको’चे सीईओ दिप्तेश जगताप म्हणाले. या संपूर्ण उपक्रमाला महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा यांचे सहकार्य लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button