Top Newsराजकारण

अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम, सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू…! नवाब मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा घणाघात

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वाद गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने कागदोपत्री पुरावे शेअर करत वानखेडे कुटुंबीयांवर सातत्याने गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचे सांगत मलिक यांनी त्यांच्यावर खोट्या कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचे सांगितले. याबाबत, आता पुन्हा एकदा मलिकांनी समीर वानखेडेंच्या आईंशी संबंधित कागदपत्रे ट्विटरवरुन शेअर केली आहेत.

मंत्री नवाब मलिक यांनी ४ दिवसांपूर्वीच मध्यरात्रीच्या सुमारास समीर वानखेडे यांचा पहिल्या लग्नातला फोटो शेअर केला होता. त्यानंतर, आता मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या आईंच्या मृत्यू दाखल्याचे फोटो शेअर करत, ‘आणखी एक फर्जीवाडा… असे म्हटले आहे. अंत्यसंस्कारासाठी मुस्लीम आणि सरकारी दस्तावेजासाठी हिंदू? धन्य है दाऊद-ज्ञानदेव’, असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे. मलिक यांनी ट्विटरवरुन झहीदा ज्ञानदेव यांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र शेअर केले आहे. यातील एक प्रमाणपत्र हे मुंबई महापालिकेचं आहे, तर दुसऱ्या प्रमाणपत्रात झहीदा यांचा उल्लेख हिंदू असा दिसून येतो. मात्र, दोन्ही प्रमाणपत्रावर झहीदा यांच्या पतीचे नाव ज्ञानदेव वानखेडेच असल्याचं स्पष्ट होत आहे.

समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सार्वजनिक वक्तव्य किंवा ट्विट करण्यास सरसकट मनाई करणारा अंतरिम आदेश देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. सकृद्दर्शनी नवाब मलिक यांनी केलेले ट्विट्स हे द्वेषातून व पूर्ववैमनस्यातून करण्यात आले. तथापि, वानखेडे हे सरकारी अधिकारी आहेत आणि नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात केलेले ट्विट हे एनसीबी विभागीय संचालकाच्या सार्वजनिक कर्तव्यांशी निगडीत आहे. त्यामुळे मंत्र्यांना वानखेडे यांच्याविरोधात बोलण्यास पूर्णपणे मनाई करू शकत नाही, असे न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले.

मलिक यांनी मध्यरात्रीच्या सुमारास वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करत त्याखाली ‘कबूल है, ..कबूल है .. कबूल है..यह क्या किया तूने?’ असे नमूद केले होते. या फोटोमध्ये वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसतात. मलिक यांनी वानखेडे यांचा पहिल्या लग्नातला फोटो शेअर करताच, वानखेडे यांचे दुसऱ्या पत्नीसोबत हिंदू पद्धतीने केलेल्या विवाहासहित पूजापाठ करतानाचे फोटो समोर आले. आईसाठी मुस्लीम पद्धतीने लग्न केले असून, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचे पालन करतो, असे कुटुंबीयातील एका सदस्याने स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button