मुंबई : आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेसमीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. दरम्यान, आता मध्यरात्रीची वेळ साधत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट करत सवालही केला आहे. त्यानंतर, वानखेडे कुटुंबीयांनी हिंदू पद्धतीने केलेल्या लग्नाचे फोटो शेअर करत मलिकांच्या फोटोबॉम्बला प्रत्युत्तर दिलंय.
मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोत समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. समीर वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसून येते. मात्र, त्याबाबत नवाब मलिक यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नाही. पण, फोटोवरूनच सवाल केला आहे. ‘कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ असे प्रश्नार्थक ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे.
वानखेडे कुटुंबातील एका सदस्याने समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्याही विवाहाचे फोटो शेअर केले. तसेच, आई मुस्लीम असल्याने तिच्या म्हणण्यानुसार मुस्लीम पद्धतीने लग्न केले होते. कारण, आम्ही भारतीय राज्यघटनेतील खऱ्या भारतीय आचार आणि धर्मनिरपेक्ष भावनेचे पालन करतो, असे वानखेडे कुटुंबीयांनी म्हटले आहे. तसेच, समीर आणि क्रांती यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत, हा लग्नसोहळा हिंदू पद्धतीने केल्याचंही त्यांनी फोटोसह सांगितलं.