मनोरंजन

जेष्ठ संगीतकार ‘राम लक्ष्मण’ जोडीतील ‘लक्ष्मण’ अर्थात विजय पाटील यांचे निधन

मुंबई : नागपुरचे सुपुत्र आणि जेष्ठ संगीतकार ‘राम लक्ष्मण’ जोडीतील संगीतकार लक्ष्मण अर्थात विजय पाटील यांचे आज नागपूर येथे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. सुरेंद्र हेंद्रे अर्थात राम आणि विजय पाटील म्हणजे लक्ष्मण अशी ही ‘राम-लक्ष्मण’ जोडी होती. राजश्री फिल्मसच्या ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट होता. १९७७ मध्ये आपले जोडीदार राम यांच्या मृत्यूनंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने चित्रपटांना संगीत दिले.

मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यंत त्यांनी सुमारे ७५ हिंदी, मराठी व भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले होते. १६ सप्टेंबर १९४२ रोजी नागपूर येथे जन्मलेल्या विजय पाटील यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांचे वडील आणि काका देखील शास्त्रीय संगीतात प्रवीण होते. त्यांच्याकडून हा वारसा विजय पाटील यांच्य्कडे आला होता. विजय पाटील यांनी वडिलांकडून संगीताचे शिक्षण घेतलेच, पण त्याचबरोबर त्यांनी संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण देखील घेतले. सुरुवातीला ते एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचे आणि तिथेच त्यांची भेट प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्याशी झाली होती. त्यांचे सादरीकरण पाहून दादा इतके खुश झाले की, आपला आगामी चित्रपट ‘पांडू हवालदार’साठी त्यांनी विजय पाटील यांची निवड केली.

‘पांडू हवालदार’च्या यशानंतर ‘राम राम गंगाराम’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘आली अंगावर’, ‘आपली माणसं’, ‘हीच खरी दौलत’, ‘देवता’, ‘लेक चालली सासरला’ अशा अनेक मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. यानंतर त्यांनी हिंदीतही त्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला. ‘राजश्री’च्या ‘मैने प्यार किया’ला त्यांनी संगीत दिले होते. यातील ‘धून’ खूप गाजल्या. ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘अनमोल’, ‘सातवा सावन’, ‘हंड्रेड डेज’, ‘पत्थर के फूल’ अशा हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

‘ढगाला लागली कळ’, ‘मुझसे जुदा होकर तुम्हें दूर जाना है’, ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान’, ‘देवा हो देवा गणपती देवा’, ‘गब्बर सिंग कह के गया’, ‘सुन बेलिया’, ‘तुम क्या मिले जाने जाना’, ‘दीदी तेरा देवर दिवाना’, ‘ये तो सच है की भगवान है’ ही त्यांची गाणी आजही रसिकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या गाण्यांच्या संगीताची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. २०१८ मध्ये त्यांना राज्य शासनाच्या ‘लता मंगेशकर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button