मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून ‘फायझर’च्या ‘अस्ट्रॅझेनेका’ची माघार
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं आहे. मात्र या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली आहे. कोणतेही कारण न देता फायझरच्या अस्ट्रॅझेनेका कंपनीने मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढलं होतं. या टेंडरद्वारे १ कोटी डोसची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका ठरली होती.
मुंबई महापालिकेच्या या प्रस्तावाला एकूण ८ पुरवठादार कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. मात्र मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली आहे. यात एक कोटी डोस खरेदीसाठी ८ पुरवठादार आले होते यातील फायझर अस्ट्रॅझेनेकाची लस पुरवणाऱ्या कंपनीने माघार घेतली आहे. पण ही माघार घेण्याचे नेमकं कारण काय? याचा कोणताही खुलासा कंपनीने केलेला नाही. तसेच कोणतेही कारण न देता फायझर अस्ट्रॅझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याने मुंबई महापालिकेला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान सध्या मुंबई महापालिका उर्वरित ७ पुरवठादारांबरोबर चर्चा करत आहे. कोरोनाची तिसरी लाट धडकण्याआधी प्रत्येक मुंबईकरांना ऑगस्ट अखेरपर्यंत लस मिळावी, असे पालिकेचे उद्दिष्ट आहे. पण इतर सात कंपन्यांनी अद्याप याबाबतची आवश्यक कागदपत्र सादर केलेली नाहीत.त्यामुळे पालिकेच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
काही दिवसांपूर्वी या सात कंपन्यांपैकी पाच कंपन्यांशी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून चर्चा केली होती. यावेळी या सातही पुरवठादारांना काही कागदपत्रही सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र,अद्याप या कंपन्यांनी ही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. हे सर्व पुरवठादार आहेत. त्यामुळे कंपनीकडून पालिकेच्या गरजेनुसार त्यांना लस पुरवठा होईल याबाबचे पत्र लस उत्पादक मिळवून ते सादर करण्याच्या सुचना पालिकेने केल्या आहेत. जेणेकरुन हे पुरवठादार कंपनीकडून आवश्यक लशींचा पुरवठा करु शकतील, अशी खात्री होऊ शकते. ही खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरु करता येणार आहे, असेही सांगण्यात आले आहे. मात्र,या कंपन्यांकडून अद्याप आवश्यक कागदपत्र सादर करण्यात आलेली नाहीत. ही कागदपत्रे सादर करण्यासाठी १ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरच मुंबईकरांच्या कोरोना लसीचा प्रश्न सुटणार आहे.