Top Newsफोकस

मुंबईत पावसाचे थैमान; महापालिकेने १० तासांत उपसले तब्बल ४४२ कोटी लिटर पाणी

मुंबई : काल संध्याकाळपासूनच पावसाने मुंबईला झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूकीचा खोळंबा झाला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. तर सोसायट्यांभोवतीही पाणीच पाणी झाले. मुंबईत अवघ्या पाच तासात २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे महापालिकेनेही युद्धपातळीवर या पाण्याचा निचरा केला. पालिकेने गेल्या दहा तासात मुंबईतील ४४२ कोटी लिटर पाण्याचा उपसा केला आहे.

महापालिकेच्या सहा उदंचन केंद्रांमध्ये (पंपिंग स्टेशन) मोठ्या क्षमतेचे एकूण ४३ उदंचन संच अर्थात ‘पंप’ कार्यरत आहेत. १७ जुलै ‌रोजी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचे पाणी खेचून ते समुद्रात टाकण्याचे काम महापालिकेच्या उदंचन केंद्राद्वारे अव्याहतपणे करण्यात आले. या साधारणपणे १० तासांच्या कालावधी दरम्यान ४४२.३५ कोटी लिटर (४४२३.५० दशलक्ष लीटर) इतके पाणी पंपाद्वारे खेचून ते समुद्रामध्ये टाकण्यात आले आहे, ज्यामुळे मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मोठी मदत झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

महापालिका क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी हाजी अली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), ईर्ला (जुहू) आणि गजधरबंध (सांताक्रुज पश्चिम) याठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे ६ उदंचन केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांमध्ये एकूण ४३ पंप आहेत. या प्रत्येक पंपाची क्षमता ही प्रत्येक सेकंदाला ६ हजार लिटर पाण्याचा निचरा करण्याची आहे. याचाच अर्थ ६ उदंचन केंद्रांमधील ४३ पंपांची पाणी उपसा करण्याची अधिकतम क्षमता ही प्रत्येक सेकंदाला २ लाख ५८ हजार लिटर एवढी आहे. तथापि, पावसाचे व उदंचन केंद्रांमध्ये वाहून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन हे पंप कार्यरत होतात, अशी माहिती वेलरासू यांनी दिली.

मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

गेल्या २४ तासांपासून कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला आहे. यामुळे मुंबईत दोन ठिकाणी दुर्घटना घडली असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईत पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आलीआहे. या काळात वाऱ्याचा वेगही ४५ kmph ते ६५ kmph एवढा असण्याचा इशारा देण्य़ात आला आहे. पुढील २४ तासांसाठी मुंबईला मुसळधार ते अति मुसळधार मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून तिथेही अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मुंबईत पुढील तीन ते चार तासांत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचणे, वेगवान वारे, रेल्वे-विमानांना अडथळे, पाणी-वीज पुरवठ्यात अडचणी येण्याची शक्यता यामध्ये देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे आपत्तीचा घेणार आढावा

मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावासाच्या हाहाकारामुळे विविध ठिकाणी कोसळलेल्या दरडींमुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची चर्चा करणार असून मुख्यमंत्री ठाकरे काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेतली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button