आरोग्यराजकारण

मुंबईतील लॉकडाऊन १ जूनपासून शिथिल होण्याचे संकेत

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. त्यामुळे १ जूनपासून मुंबईतील लॉकडाऊनमध्ये शिथिलता येण्याची शक्यता आहे. मुंबईतील दुकानदारांना सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात दुकानाचे शटर उघडण्याची, सम, विषम तत्वावर एक दिवस रस्त्याच्या एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याबाबत सरकार, पालिका यांचा विचार असल्याचे समजते.

याबाबत निर्णयाची अधिकृत घोषणा राज्य सरकार व मुंबई महापालिका १ जून रोजी करणार आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकानदारांना दिलासा दिला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. सरकार ब पालिका यंत्रणा यांनी युद्धपातळीवर विविध उपाययोजना करून कोरोनावर जानेवारी २०२१ पर्यंत चांगले नियंत्रण मिळविले होते; मात्र दुर्दैवाने काही बेफिकीर नागरिकांमुळे आणि काही प्रमाणात प्रशासकीय दुर्लक्षितपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढीस लागला. परिणामी राज्य सरकारने मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू केले. त्यास वारंवार मुदतवाढ देण्यात आली. मात्र फेब्रुवारी ते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व रुग्णांची संख्याही कमी झाल्याने सरकार व पालिका सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमधील नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने समय मर्यादेत उघडण्यास सरकार व पालिकेची परवानगी आहे. मात्र आता १ जूनपासून, रस्त्याच्या एका बाजूच्या दुकानदारांना सकाळी तर दुसऱ्या बाजूच्या दुकानदारांना दुपारी दुकाने समय मर्यादेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याबाबतची आणि सम, विषम तत्वावर एक दिवस रस्त्याच्या एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याबाबत सरकार, पालिका यांची विचारप्रक्रिया सुरू असल्याचे समजते.मात्र कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशही दिले जाणार असल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button