मुंबई : पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने अबलेची रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. त्यावरून, विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात कायद्याचा धाक उरला नसल्याचंही भाजपाने म्हटले आहे. त्यामुळे, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान, पोलिसांना त्यांचे काम करू द्या. तरीही साकीनाका प्रकरणाची फाईलही कुणाला ‘ईडी’ वगैरेकडे सोपवायची असेल तर त्यांना कोण रोखणार? काय वाट्टेल ते करू द्या !, असेही राऊत यांनी अग्रलेखात म्हटले आहे. या प्रकरणाचं राजकारण होत असल्याचा थेट आरोपच त्यांनी केलाय.
मुंबईसह महाराष्ट्रात असे कायद्याचेच राज्य आहे. विरोधकांनी साकीनाका बलात्कारप्रकरणी कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही. विरोधी पक्षनेते सांगतात, त्याप्रमाणे त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईल. कोणत्या विषयाचे व प्रकरणाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे. साकीनाकाप्रकरणी डोळय़ांत अश्रू यावेत ही मनाची संवेदनशीलता आहे, पण नक्राश्रू ओघळू लागले की, भीती वाटते, प्रकरणाचे गांभीर्य नष्ट होते, असे शिवसेनेनं म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने या प्रकरणात विरोधी पक्षाची जी काही भूमिका आहे ती चोख बजावली आहे. मुंबई-महाराष्ट्रात महिला कशा सुरक्षित नाहीत असे तो आता ओरडून सांगत आहे. साकीनाक्याच्या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला असला तरी मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. अशा घटना एका भयानक विकृतीतून घडत असतात व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ही विकृती उफाळून येऊ शकते, असेही ते म्हणाले.
सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार
राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून याला केवळ सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे. यांना फक्त आपली खुर्ची सुरक्षित कशी ठेवता येईल याचीच काळजी लागून आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सपशेल अपयशी ठरले आहे. अशी टीका प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा : फडणवीस
मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. अशी प्रकरणं वारंवार होत राहिली तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन फाशीच झाली पाहिजे, असं मत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. फडणवीसांनी यावेळी याप्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला देखील दिला आहे. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालून तातडीनं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलून एक विशेष जलदगती न्यायालय स्थापन करुन यात खटला चालवला जाईल यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि पोलिसांनी याप्रकरणाशी निगडीत इतर आरोपींचा तातडीनं शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत”, असं फडणवीस म्हणाले.