अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात : महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई : राज्य शासनाच्या निकषानुसार आणि नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचलं असून, यामुळं मुंबई यामध्ये तिसऱ्या गटात येत आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुपटीचं प्रमाण ५१५ दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला दोन आठवड्यांची आकडेवारी पाहता मुंबईचा पॉझिटीव्हिटी रेट ५ टक्क्यांपर्यंत आहे. ज्यामुळं मुंबई ही तिसऱ्या लेवलपर्यंत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. येत्या काळात पहिल्या आठवड्यात मुंबईत तिसऱ्या टप्प्यावर असली तरीही येत्या काळात मुंबई पॉझिटीव्हिटी रेटमध्ये दुसऱ्या टप्प्यात आल्यास त्यानुसार नियम लागू केले जाती. मुख्यमंत्री कार्यालय किंवा खुद्द मुख्यमंत्री काही वेळात याबाबतच्या सूचना जाहीर करतील असंही त्या म्हणाल्या. राज्य सरकारच्या निकषांनुसार सायंकाळी मुंबईतील व्यवहारांसाठीचं एक परिपत्रक काढण्यात येईल. तेव्हा देशाच्या आर्थिक राजधातीनील या अनलॉकचं चित्र अधिक स्पष्ट होईल अशी स्पष्टोक्ती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
विरोधी पक्षाकडून लसीचं ग्लोबल टेंडर आणि इतरही नियोजनाच्या बाबतीच होणारी टीका पाहता या पक्षाकडून शब्दांचा झिम्माच सुरु आहे. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपलं लक्ष्य काय आहे त्यावरच लक्ष केंद्रीत करण्यास आमचं प्राधान्य आहे, ही बाब महापौरांनी ठणकावून सांगितली. टीका करण्यापेक्षा नागरिकांच्या हिताचा विचार विरोधी पक्षानंही करावा असा आग्रही सूर यावेळी त्यांनी आळवला.