मनोरंजन

मुंबई हायकोर्टाचा प्रीती झिंटाला झटका

मुंबई : वांद्र्यामधील आपल्या तीन फ्लॅट्सची विक्री एका कंपनीला करून त्या फ्लॅट्सचे शेअर सर्टिफिकेट देण्यात दिरंगाई करणाऱ्या अभिनेत्री प्रीती झिंटाचे अपिल फेटाळून मुंबई हायकोर्टाने तिला नुकताच झटका दिला. ‘प्रीती झिंटा आपल्याच चुकीच्या कृत्याचा फायदा घेत आता विलंबाच्या कारणाखाली कंपनीच्या याचिकेला विरोध करू शकत नाही’, असेही न्या. शाहरुख काथावाला व न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने अपिल फेटाळताना नमूद केले.

प्रीती व नीलप्रभा झिंटा यांनी फेब्रुवारी-२०१६मध्ये वांद्रे पश्चिमेकडील क्वांटम पार्क इमारतीतील दहाव्या मजल्यावरील आपल्या तीन फ्लॅट्सची विक्री ‘एस हाऊसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनी’ला एकूण सात कोटी १२ लाख ५९ हजार ८०० रुपयांना केली होती. त्यानुसार दोन्ही पक्षकारांमध्ये करारनामाही झाला. मात्र, त्यावेळी फ्लॅट्समध्ये जेफरी रॉड्रिग्ज हे झिंटा यांचे भाडेकरू म्हणून राहत होते. त्यामुळे रॉड्रिग्ज हे भाडे करारनामा संपेपर्यंत राहतील आणि यापुढे ते मासिक भाडे एस कंपनीला देतील, असेही ठरले होते.

दुसरीकडे फ्लॅट्सवर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे कर्ज थकित असल्याने मिळालेल्या रकमेतून झिंटा या कर्जफेड करतील आणि बँकेकडे असलेले शेअर सर्टिफिकेट व अन्य आवश्यक कागदपत्रे कंपनीला देतील, असेही ठरले होते. परंतु, वारंवार पाठपुरावा करूनही झिंटा यांनी शेअर सर्टिफिकेट दिले नाही. त्यामुळे सोसायटीकडे पाठपुरावा केला असता, मूळ शेअर सर्टिफिकेट व अन्य आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतच तुमच्या नावावर ते हस्तांतरीत केले जातील, असे उत्तर सोसायटीने दिले. त्यामुळे कंपनीने यावर्षी मुंबई हायकोर्टात एकल न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर दावा केला होता. अखेरीस कर्जफेडीनंतर बँकेकडून ३० मे २०१८ रोजी शेअर सर्टिफिकेटसह अन्य कागदपत्रे मिळाल्याचे प्रीती झिंटाने २८ सप्टेंबर २०२० रोजी प्रतिज्ञापत्राद्वारे उघड केले. तसेच ते शेअर सर्टिफिकेट हायकोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा केले. त्यानंतर कंपनीने केलेल्या अर्जावर निर्णय देताना शेअर सर्टिफिकेट कंपनीला देण्याचे आणि शेअर्स कंपनीच्या नावे हस्तांतर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. त्याविरोधात प्रीतीने अपिल केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button