बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना जामीन देण्यास हायकोर्टाचा पुन्हा नकार
मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन देण्यास उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा नकार दिलाय. मात्र, त्यांच्या पत्नी हेमंती यांना उच्च न्यायालयानं दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी राखून ठेवलेला निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यात डी. एस. कुलकर्णी यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. त्यानंतर आता डी. एस. कुलकर्णी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
डीएसके ग्रुपने ज्यादा व्याजाचे अमिष दाखवून राज्यातील हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनेक ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. गुंतवणूकदारांची दोन हजार कोटी रुपयांना फसवणूक केल्याच्या प्रकरणात डीएसके यांच्यासह पत्नी हेमंती हे दोघेही येरवडा कारागृहात आहेत. डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासमोर सुनावणी पार पडली होती. शुक्रवारी त्यांनी निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यावेळी उच्च न्यायालयाने हेमंती कुलकर्णी यांना जामीन दिला. मात्र, डीएसकेंना दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं कुलकर्णी यांचे वकील श्रीवास्तव यांनी सांगितलं.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये डी. एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कोरोना संसर्गानंतर त्यांना पुण्याताली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मुलीच्या तेराव्याचे विधी करण्यासाठी डी.एस. कुलकर्णी यांच्यासह पत्नी हेमंती कुलकर्णी, मुलगा शिरीष कुलकर्णी यांना न्यायालयानं काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येण्यासाठी परवानगी दिली होती.