मुंबई : जालन्याच्या परतूर तालुक्यातील येनोरा येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत, यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारला आवाहन केले आहे. मराठा समाजानं अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलनं केली तरी सरकारकडून त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही वेळोवेळी पदरी निराशाच पडत असल्याची खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.
परतूर तालुक्यातील येनोरा ( जि. जालना ) येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत, यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाजातील तरूण मुख्य प्रवाहातून बाहेर पडला आहे. या तरूणांना सक्षम करण्यासाठी आम्ही समाजाच्या वतीने शासनाकडे आरक्षणासह सारथी संस्था, आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून उच्चशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय उपलब्धता यांसारख्या इतर अनेक मागण्या केलेल्या आहेत. त्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलने केली. मात्र शासनाकडून त्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. वेळोवेळी समाजाच्या पदरी निराशाच पडत आहे.
आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहे. त्या न्यूनगंडातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. देशाचे भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणे, हे राष्ट्रास अहितकारक आहे.
प्रशासनातील काही अधिकारी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारला अर्धवट माहिती देऊन सरकारची दिशाभूल करीत आहेत. सरकारला माझी सूचना आहे कि सरकारने आता तरी जागे व्हावे व याविषयात जातीने लक्ष घालावे. अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू करावी तसेच समाजाच्या इतर मागण्यांवर ठोस कार्यवाही करून तातडीने अंमलबजावणी करावी.
सदाशिव भुंबर यांस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून समाजातील तरूणांना मी कळकळीची विनंती करतो की मी तुमच्यासाठी सदैव लढायला तयार आहे, तुमचे धैर्य हिच समाजाची ताकद आहे. त्यामुळे कुणीही हिम्मत हरू नका. असा मार्ग निवडू नका. आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी व भावी पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण एकजुटीने व धैर्याने लढा देऊ.
पन्हाळा तालुक्यातील तरुणाचीही आत्महत्या
दुसरीकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याच्या कारणातून पन्हाळा तालुक्यातील एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. कर्ज मंजूर होऊनही रक्कम मिळत नसल्यानं पन्हाळा तालुक्यातील तरुणाने आत्महत्या केली आहे. जय डवंग असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यासह बँक निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.